साखळीतील पुरातन विहिरींच्या संवर्धनाची गरज

प्रतिनिधी
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

बाजार परिसराच्या विकासाला चालना देण्याची व्यापारी व नागरिकांची मागणी

साखळी:  साखळी बाजार परिसराचा विकास सरकार व साखळी नगरपालिका यांच्यातर्फे हाती घेण्यात आला असून साखळी बाजारातील दोन पुरातन विहिरींचे संवर्धन करावे, अशी मागणी साखळी बाजारातील व्यापारी व नागरिकांनी केली आहे. साखळी पालिका नवीन सुसज्ज इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आल्यानंतर साखळी बाजार परिसराच्या विकासाचे काम सरकार व साखळी पालिका यांच्यातर्फे हाती घेण्यात आले होते. 

कोरोना विषाणूच्या लॉकडाऊनमुळे काही काळ यामध्ये खंड पडला होता. आता त्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे. या विकासामध्ये विठ्ठलापूर ते साखळी बाजार जोडणारा पूल, विठ्ठलापूर - साखळी बाजार ते कदंब बसस्थानक असा एकेरी रस्ता, साखळी बाजारातील पुरातन किल्ला आदींचा समावेश आहे. साखळी बाजारात दोन पुरातन विहिरी असून साखळी बाजाराचा विकास करताना या विहिरींकडे दुर्लक्ष करू नये या दोन्हीही विहिरींचे संवर्धन करून त्या विहिरी वाचविण्यात याव्यात, अशी मागणी साखळी बाजारातील व्यापारी व नागरिक करीत आहेत.

विठ्ठलापूर-साखळी बाजाराला जोडणाऱ्या पुलाचे काम कोरोना लॉकडाऊनमुळे बंद होते ते पुन्हा सुरू झाले आहे. या ठिकाणी असलेला  लोखंडी पोर्तुगीजकालीन पदपुल पाडून त्या जागी वाहने नेता येईल असा रुंद पूल बांधण्यात येणार आहे. जेणेकरून विठ्ठलापूर - बाजार ते कदंब बसस्थानक असा बगल रस्ता साकारणार आहे. त्याचबरोबर साखळी बाजारातील पुरातन किल्ल्याची डागडुजी व पुनर्निमाणाचे कामही हाती घेतले असून त्यासाठी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली सर्व दुकाने हटवून सर्वांना पालिका काडामार्केटमध्ये दुकाने उपलब्ध करुन स्थलांतर करण्यात आले आहे. किल्ल्याचे पुनर्निमाण करताना त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा, ऐतिहासिक वास्तूसंग्रहालय, शिवकालीन इतिहासाचे वाचनालय असा समावेश आहे.

संबंधित बातम्या