मनुष्यबळ विकासावर भर देण्याची गरज

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

गोवा १९६१ पूर्वी स्वंयपूर्ण होता, मात्र आता प्रत्येक भाजी, दूध चिकन, मटण व अन्य जीवनावश्‍यक वस्तूसाठी आम्ही परराज्यावरील अवलंबित्व वाढत हे चित्र बदलण्याची गरज आहे, त्यासाठी राज्यातील मनुष्यबळ विकासावर जास्त भर देण्याची गरज आहे.

काणकोण :  गोवा १९६१ पूर्वी स्वंयपूर्ण होता, मात्र आता प्रत्येक भाजी, दूध चिकन, मटण व अन्य जीवनावश्‍यक वस्तूसाठी आम्ही परराज्यावरील अवलंबित्व वाढत हे चित्र बदलण्याची गरज आहे, त्यासाठी राज्यातील मनुष्यबळ विकासावर जास्त भर देण्याची गरज आहे. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस स्वयंपूर्ण मित्र शनिवार किंवा रविवारी  पंचायतीत येऊन येथील पंच, सरपंच, सामाजिक संस्था यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून  त्याच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत. २ ऑक्टोबरपासून ही योजना मार्गी लागणार आहे, असे  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्रीस्थळ पंचायत सभागृहात आयोजित सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना सांगितले. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, या योजनेसाठी  राज्यातील दोनशे अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. सामान्य नागरिकांच्या अडचणी व मूलभूत गरजा समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी हा प्रयत्न आहे. शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना  व्हिलचेअर, अन्य सुविधा देऊन त्यांना सक्षम व आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अशा व्यक्तींना एका महिन्याच्या कालावधीत त्याच्या गरजा भागविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भाजपचे ज्येष्ठ सदस्य ज्यांनी कारसेवेतही भाग घेतला होता, असे श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील भिकरी जानू वेळीप यांच्या हस्ते श्रीफळ, शाल, मानपत्र व समई देऊन गौरव करण्यात आला.
उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांचा गौरव लोलये येथील भाजपचे जेष्ठ सदस्य कमलाक्ष टेंग्से यांच्या हस्ते श्रीफळ, शाल, मानपत्र व समई देऊन करण्यात आला. २२ वर्षात कॉंग्रेस पक्षांत राहून काम केले. त्यापेक्षा कित्येक पटीने काम केल्याचे समाधान भाजप पक्षात गेल्या दीड वर्षात काम केल्यानंतर मिळाले आहे. संघटन व संघटना याचे महत्त्व भाजपात काम करताना समजल्याचे त्यांनी सांगितले. 

उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काणकोण तालुक्यातील विकास कामासंबंधी सदैव सढळ हस्ते मदत केली आहे. कोरोना महामारीचा काळ असूनही काणकोणातील अनेक विकासकामांना मजुरी दिली. मनुजा नाईक गावकर यांनी मुख्यमंत्री व विद्या गायक यांनी उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.

आदिवासी कल्याण आयोगाचे अध्यक्ष माजी मंत्री रमेश तवडकर, माजी मंत्री विजय पै खोत, नगराध्यक्ष नितू समीर देसाई, श्रीस्थळचे सरपंच गणेश गावकर, सर्वानंद भगत, महेश नाईक, मंडळ अध्यक्ष नंदीप भगत उपस्थित होते. महिला मोर्चाच्या राज्य सचिव तन्वी कोमरपंत, भाजप मंडळाच्या उपाध्यक्षा प्रणाली प्रभूगावकर, चंदा देसाई, मनूजा नाईक गावकर यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सूत्रसंचालन सुरज नाईक गावकर यांनी केले. चंदा देसाई यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या