राजधानीतील घराघरातील कचरा उचलण्याची गरज

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

राजधानी पणजीतील काही घरांमधील कचरा उचलण्यास दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. कॉलनीमधील काही घरांतील ओला आणि सुका कचरा इमारतीखाली आणून ठेवला जातो. परंतु कचऱ्याची उचल करणारे वाहन वेळेत किंवा आलेच नाही तर दुसऱ्या दिवसापर्यंत हा कचरा तेथेच पडूण राहतो.

पणजी : राजधानी पणजीतील काही घरांमधील कचरा उचलण्यास दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. कॉलनीमधील काही घरांतील ओला आणि सुका कचरा इमारतीखाली आणून ठेवला जातो. परंतु कचऱ्याची उचल करणारे वाहन वेळेत किंवा आलेच नाही तर दुसऱ्या दिवसापर्यंत हा कचरा तेथेच पडूण राहतो. परिणामी या कचऱ्यावर कुत्रे ताव मारतात आणि यातील काही नाशवंत कचरा परिसरात विखुरल्याने दुर्गंधी पसरत आहेत. 

राजधानी पणजीत बैठ्या घरांचे प्रमाण आणि फ्लॅट असणाऱ्या इमारतींचे प्रमाण यात फरक आहे. फ्लॅट असणाऱ्या कॉलनीचे जाळे आता इतर शहरांप्रमाणे पणजीमध्येही पसरत आहे. अशा कॉलनीमध्ये काम करणारे नोकरदार शिफ्टप्रमाणे काम करतात किंवा त्यांचा कामाचा दिवस सकाळी लवकरही सुरू होतो. सकाळी कचरा ठेवण्याची वेळ चुकली कि परत तो कचरा घरी नेऊन ठेवण्यास नोकरदार लोक घरी असत नाहीत. काही कॉलनीचे द्वार हे उघड्या स्वरूपात असते तेथे सुरक्षारक्षकाही नसतात. अशा ठिकाणी कुत्र्यांकडून कचऱ्याच्या पिशव्या फोडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. शिवाय रस्त्यावर फिरणारी गाईगुरेसुद्धा पिशव्यांमध्ये भाजीपाल्यांची देठे शोधण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर भटकी कुत्रीही अन्नाचा शोध घेण्यासाठी ठेवलेल्या कचऱ्यावर तुटून पडतात. 

पणजीत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असल्याचे दृष्टीस पडते. त्यामुळे कचरा योग्य प्रकारे उचलला जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राजधानी पणजीला स्मार्ट करायचे असेल तर कचऱ्याच्या समस्येचे निराकरण होणे आवश्यक आहे. कचरा वाढला की मच्छर आणि इतर कीटकांचा त्रास वाढतो. डेंग्यू आणि मलेरिआचे रुग्ण यामुळे वाढू नयेत म्हणून कचऱ्याची समस्य कायमची निकालात काढणे गरजेचे आहे, अशी लोकांची मागणी आहे.

...तर महापालिकेकडे तक्रार करावी
राजधानी कोरोनामुक्त झाल्यावरच कचरा उचलण्यात येणार असल्याची माहिती पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी दिली. एखाद्या फ्लॅटमध्ये कोरोना रुग्ण असल्यास कचरा उचलणाऱ्या लोकांनाही कोरोना होण्याची शक्यता असते. लोकांच्या घराजवळचा कचरा उचलला जात नसेल तर त्यांनी महानगरपालिकेला तशी तक्रार करावी. हा निर्णय लोकांच्या कल्याणासाठीच घेण्यात आल्याने लोकांनीही महानगरपालिकेला साथ देणे आवश्यक असल्याचे महापौर मडकईकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या