डिचोलीतील बालोद्यानच्या देखभालीकडे दुर्लक्ष

Neglect of kindergarten maintenance in Dicholi
Neglect of kindergarten maintenance in Dicholi

डिचोली :  शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हिराबाई झांट्ये स्मृती सभागृहासमोर असलेल्या बालोद्यानात सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या असून, हे बालोद्यान दिवसेंदिवस असुरक्षित बनत चालले आहे. या बालोद्यानाची दुरवस्था झाली असून, त्याला समस्यांचे ग्रहण लागले आहे. या बालोद्यानातील समस्या दूर करण्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी हे बालोद्यान असून, नसल्यासारखेच वाटत आहे. या बालोद्यानात गेल्यानंतर तेथील समस्यांची प्रत्येकाला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. मोडलेल्या संरक्षक कठड्याची दुरुस्ती तसेच अन्य साधनसुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष झाल्याने या बालोद्यानाला सध्या अवकळा पसरली आहे. लहान मुलांना मुक्‍तपणे खेळण्या-बागडण्यासाठी मिळावे, हा हेतू समोर ठेवून हे बालोद्यान उभारले आहे. मात्र, त्याच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने त्याची दिवसेंदिवस वाताहत होत चालली आहे. शहरातील नाईकनगरमधील तसेच पालिका कार्यालय इमारतीसमोरील बालोद्यानांना नवा साज देण्यात आला आहे.  मात्र, मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बालोद्यानातील समस्या दूर करण्याकडे लक्ष जात नसल्याबद्‌दल नागरिक आश्‍चर्य व्यक्‍त करीत आहेत. 

लाजरीने वेढले, झोपाळे गायब!

मिनरल फावंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या या बालोद्यानाचे सोळा वर्षापुर्वी 22 ऑगस्ट 2004 यादिवशी उद्‌घाटन करून ते लोकार्पण करण्यात आले आहे. या बालोद्यानाच्या देखभालीची जबाबदारी पालिकेकडे आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याची वाईट स्थिती झाली आहे. या बालोद्यानात सध्या झुडपे वाढली आहेत. बालोद्यानात कोपऱ्या कोपऱ्यात मोठ्या प्रमाणात लाजरीही उगवलेली आहे. त्यामुळे बालोद्यानाला विदारक स्वरूप प्राप्त झाले आहे. लहान मुलांसाठी झोपाळ्यांची सोय करण्यात आली होती. मात्र, त्यांपैकी बहुतेक सर्व झोपाळे मागील चार-पाच वर्षांपूर्वीपासून गायब आहेत. नवीन झोपाळे बसवण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. घसरगुंडी आणि अन्य खेळण्याची साधनेही गंजून ती मोडकळीस आली आहेत. या बालोद्यानातील समस्यांमुळे लहान मुलांबरोबरच पालकांनाही हिरमुसले व्हावे लागते. गैरसोयीमुळे तर बहुतेक पालक आपल्या पाल्यांना या बालोद्यानात घेऊन जाण्याचे टाळत आहेत. आठ वर्षापूर्वी बालोद्यानाच्या संरक्षक कठड्याचा एकाबाजूने साधारण दहा मीटर भाग कोसळून पडला आहे. मात्र, त्याची दुरुस्ती करण्याकडे अद्याप लक्ष देण्यात आलेले नाही. पावसाळ्यात बाजूला पाणी तुंबले की, पाणी बालोद्यानात घुसते. त्याबरोबर कचराही वाहून येतो. बाजूच्या झाडीतून सापही बालोद्यानात शिरतात. अशी माहिती काहींनी दिली. यामुळे हे बालोद्यान असुरक्षित बनत असल्याचे स्पष्ट होत आहे.

प्रेमीयुगूलांचा वावर !

काही वर्षांपुर्वी या बालोद्यानात रोज सायंकाळी लहान मुलांचा किलबिल आणि गजबजाट दिसून येत होता. सुटीच्या दिवशी तर बालोद्यानाला जत्रेचे स्वरूप येत असे. मात्र या बालोद्यानाच्या दुरवस्थेमुळे लहान मुलांनी तसेच पालकांनी आता बालोद्यानाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे बालोद्यानात शुकशुकाट दिसून येत आहे. बालोद्यानात कोणी येत नसल्याच्या संधीचा फायदा घेत प्रेमीयुगूलांचा वावर मात्र या बालोद्यानात वाढला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com