राज्यातून नेपाळचा कामगरावर्गही स्वगृही

Dainik Gomantak
गुरुवार, 28 मे 2020

तिसरी बस ४० जणांना घेऊन पणजीतून रवाना

विलास ओहाळ
पणजी

 गोव्यात इतर राज्यातूनच नव्हेतर नेपाळमधीलही कर्मचारी वर्ग मोठ्‍या प्रमाणात कामाला आहे. या कर्मचाऱ्यांनाही पुढील भवितव्य अंधारमय दिसू लागल्याने आपल्या देशात परतण्याचा निर्णय घेतला आहे. काल (मंगळवारी) आणि आज असे सुमारे १२० कर्मचारी नेपाळला बसने रवाना झाल आहेत. टाळेबंदी उठण्याची आणि व्यवसाय सुरू होण्याची काही चिन्हे दिसत नसल्याने देशात परतत असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
नेपाळ सरकारने गोव्यातील कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी बसेस पाठविल्या आहेत. त्यातील तिसरी बस आज सायंकाळी ४० कामगारांना घेऊन रवाना झाली. ही बस देशाच्या बिहारमधील नेपाळच्या प्रवेशद्वारापर्यंत जाणार आहे. सर्व देश आपापल्या नागरिकांना परत आणत आहेत. भारतानेही परदेशातील नागरिक विमान आणि जलमार्गाने भारतात आणले आहेत. त्याप्रमाणे आता नेपाळनेही आपल्या देशातील आणि भारतात काम करणारा वर्ग नेण्यासाठी बसेस सोडल्या आहेत.
गोव्यात रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये स्वयंपाक्याचे त्याचबरोबर वेटरचेही कामात हा वर्ग होता किंवा आहे. त्याशिवाय काही ठिकाणी अनेक बंगल्यावर नेपाळमधील कामगार त्या बंगल्याचे केअरटेकर म्हणून काम करतात. परंतु जे हॉटेल आणि इतर ठिकाणी कामाला नेपाळी लोक होते, ते आता टाळेबंदीमुळे घरी जाण्याच्या विचारात आहेत. त्यानुसार आत्तापर्यंत पणजीतून तीन बसेस बिहारकडे रवाना झाल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या कर्मचाऱ्यांनी राज्यातील सरकारी कार्यालयात आपली माहिती दिली आहे, त्याचबरोबर अनेकवेळा त्यांनी सरकारी कार्यालयात नेपाळच्या सीमेपर्यंत जाण्यासाठी रेल्वेगाडी सोडली जाणार की नाही, याची विचारणाही केल्याची माहिती राजू छेत्री या युवकाने दिली. काल (मंगळवारी) दोन बसेसे ८० जणांना घेऊन बिहारकडे रवाना झाल्या आहेत. तर आज एक बस ४० जणांना घेऊन निघणार आहे. या बसेससाठी साडेसात हजार रुपये प्रत्येकी खर्च स्वखिशातून त्यांना द्यावा लागणार आहे. पाच दिवसांचा हा प्रवास असून, या दिवसांतील जेवणाचा खर्चही या कर्मचाऱ्यांनाच उचलावा लागणार आहे.

खिलाया-पिलाया वही
हमारे लिए बहुतकुछ है..!

‘टाळेबंदी चल रहा है, कब खतम होगा मालूम नही. लेकीन अभितक हम जहा रहते थे यानेकी हॉटेलमे काम करते थे, उस मालिकने हमको इतने दिन खिलाया-पिलाया वही हमको बहुतकूछ है. पैसा नदी दिया तोभी कोई बात नही, लेकीन पैसा होता, तोभी हम कैसे जाते थे..!’ असे सांगत राजू छेत्रीच्या डोळ्यात अश्रू तरळले. पुन्हा गोव्यात येणार काय अशी विचारणा केल्यावर तो म्हणाला की, देखेंगे... लॉकडाऊन कब खतम होता है. इधरका माहौल अच्छा होगया तो वापस आऐंगे नही तो उधरही काम करना पडेगा.

संबंधित बातम्या