कोविड रुग्णांसाठी नवीन जिल्हा इस्पितळ सज्ज

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

कोविड इस्पितळ शुक्रवारपासून कार्यान्वित करण्याची तयारी सुरू आहे. खाटा व इतर सुविधांचे काम सुरू आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील डॉक्टर या कोविड इस्पितळात रुग्णांवर उपचार करतील,  असे हॉस्पिसियो इस्पितळाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिपा कुरैया यांनी सांगितले. 

मडगाव: येथील नवीन जिल्हा इस्पितळात २५० खाटांचे कोविड इस्पितळ सुरू करण्याची तयारी करण्यात येत असून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी जाहीर केल्यानुसार येत्या शुक्रवारपासून हे कोविड इस्पितळ कार्यान्वित होणार आहे. 

कोविड इस्पितळ शुक्रवारपासून कार्यान्वित करण्याची तयारी सुरू आहे. खाटा व इतर सुविधांचे काम सुरू आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील डॉक्टर या कोविड इस्पितळात रुग्णांवर उपचार करतील,  असे हॉस्पिसियो इस्पितळाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिपा कुरैया यांनी सांगितले. 

गोमेकॉच्या डॉ. सुनंदा आमोणकर व डॉ. राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथके या कोविड इस्पितळात कोरोना रुग्णांवर उपचार करतील. चिंताजनक स्थितीतील रुग्णांना इएसआयच्या कोविड इस्पितळात किंवा गोमेकॉत हलवण्यासाठी या इस्पितळाच्या ठिकाणी दोन रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत. या इस्पितळात कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना दाखल करण्यात येईल. चिंताजनक स्थितीतील कोरोना रुग्णांवर गोमेकॉत, मध्यम स्थितीतील रुग्णांवर इएसआय कोविड इस्पितळात उपचार करण्यात येतील. 

नवीन जिल्हा इस्पितळाचे कोविड इस्पितळात रूपांतर करण्यात येणार असल्याने हॉस्पिसियो इस्पितळाचे नवीन जिल्हा इस्पितळ इमारतीतील स्थलांतर करण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन जिल्हा इस्पितळाचे शस्रक्रिया कक्ष पूर्ण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. अनेक तंत्रज्ञ या कामात गुंतले होते. तथापि, कोविड इस्पितळ सुरू करण्यात येणार असल्याने हे काम बंद करण्यात आले आहे. 

कामत, सरदेसाईंकडून स्वागत
नवीन जिल्हा इस्पितळात कोविड इस्पितळ सुरू कऱण्याच्या सरकारच्या निर्णयाचे विरोधी पक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत, तसेच फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी स्वागत केले आहे. 

उशीरा घेतलेला पण रास्त निर्णय अशी प्रतिक्रिया कामत यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे बरेच हाल होत असून या निर्णयामुळे रुग्णांना व नागरिकांना दिलासा मिळणार आहे. सरकारने आता या नवीन संकुलात सर्व सुविधा पुरवण्याची व्यवस्था करावी, असे कामत यांनी म्हटले आहे.   

नवीन जिल्हा इस्पितळातील रिकामे असलेल्या दोन मजल्यांसह संपूर्ण इस्पितळ कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात यावे असे मत सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे त्रस्त झालेल्या साष्टीकरांसाठी इस्पितळात जादा खाटांची आवश्यकता होती. सरकारला जरा उशिराच जाग आली. सरकारने आता स्वप्नरंजन नियोजनाचा त्याग करून कोरोना संकटाचा सामना करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या