मडगावात नवे कोविड इस्पितळ सुरू

प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

प्रकृतीत सुधारणा झालेल्या ईएसआय कोविड इस्पितळातील रुग्णांना हलवले

मडगाव: येथील नवीन जिल्हा इस्पितळातील कोविड इस्पितळ आजपासून सुरू झाले असून आज संध्याकाळी ईएसआय - कोविड इस्पितळातील प्रकृती सुधारलेल्या रुग्णांना या इस्पितळात दाखल करण्यात आले. हे नवीन कोविड इस्पितळ सुरू झाल्याने ईएसआय कोविड इस्पितळावर पडणारा ताण कमी होणार आहे. 
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी डॉक्टरांच्या पथकासह आज जिल्हा इस्पितळात भेट देऊन कोविड इस्पितळ सुरू करण्याच्या तयारीचा आढावा घेतला. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, या कोविड इस्पितळात नोडल वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या डॉ. सुनंदा आमोणकर व डॉ. राजेश पाटील, जिल्हा इस्पितळाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिपा कुरैया, ईएसआय इस्पितळाचे प्रमुख डॉ. विश्वजित फळदेसाई, डॉ. राजेश्वर नाईक, डॉ. विरेंद्र गावकर उपस्थित होते. 

सरकारने आश्वासन दिल्यानुसार आजपासून हे कोविड इस्पितळ सुरू करण्यात येत आहे. आज संध्याकाळपासून प्रकृतीत सुधारणा झालेले  ईएसआय इस्पितळातील रुग्ण येथे हलवण्यात येतील. सुरुवातीला १०० खाटांची सोय या इस्पितळात करण्यात आली आहे. पुढील १० दिवसांत या इस्पितळातील वैद्यकीय व्यवस्था स्थिरस्थावर होणार आहे. त्यानंतर या इस्पितळातील खाटांची क्षमता ३५० पर्यंत वाढवण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 

सध्या  कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात येतील. त्यानंतर या इस्पितळातील वैद्यकीय सुविधांचा दर्जा वाढवून येथे गंभीर प्रकृतीच्या रुग्णांवरही उपचार करण्यात येतील, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.या इस्पितळातील ओपीडीत झालेल्या तपासणीत पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांनाही थेट दाखल करून घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. इस्पितळातील डॉक्टरांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी ७० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

वैद्यकीय किट  देणार 
घरी विलगीकरणात राहणाऱ्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी औषधे व वैद्यकीय साधनांचे एक किट  देण्यात येणार आहे. रुग्णामध्ये प्रतिकार शक्ती वाढावी व त्याला न्यूमोनिया होऊ नये, यासाठी हा किट उपयुक्त ठरणार आहे. या किटमध्ये ऑक्सिमीटर, थर्मामीटर असेल. याच्या आधारे रुग्णांना प्राणवायुचा  स्तर व तापाचे प्रमाण तपासता येईल. येत्या काही दिवसांत या किटचे वाटप  सुरु करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या