
New Education Policy in Goa: गोव्यामध्ये ‘एनईपी’ नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील एकूण बारा तालुक्यांतून १२ विद्यालयांची निवड करण्यात आलेली आहे. सत्तरीतील ठाणे सरकारी माध्यमिकची नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी निवड करण्यात आलेली आहे. बारावीपर्यंत नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या शाळेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
मुख्याध्यापक काशिनाथ नाईक यांनी सांगितले, की या धोरणांतर्गत अंतर्गत विद्यालयाचे सर्व वर्ग डिजिटल करण्यात येणार असून फळा व खडूला पूर्णपणे फाटा देण्यात येणार आहे. या शाळेच्या एकूण रचनेच्या पार्श्वभूमीवर या शाळेची निवड करण्यात आलेली आहे.
शाळा होणार हायटेक; दरवर्षी ३० लाख खर्च
ठाणे सरकारी माध्यमिक विद्यालय शाळा हायटेक करण्यात येणार आहे. यासाठी पुढील पाच वर्षासाठी प्रत्येक वर्षी ३० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठीही पुरेसा वेळ मिळणार आहे. सध्या एसीजीएल कंपनी व एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून शाळेतील काही वर्ग पूर्णपणे डिजिटल करण्यात आले आहेत. स्मार्ट टीव्हीही लावण्यात आला आहे.
२०१८ पासून निकाल शंभर टक्के
काशिनाथ नाईक यांची २०१८ साली मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर या शाळेचा निकाल सातत्याने शंभर टक्के येऊ लागला आहे. त्यामुळे या शाळेच्या पटसंख्येतही सातत्याने वाढ होऊ लागली. वाढती पटसंख्या व दर्जात्मक शिक्षण याच्या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक धोरण अवलंबविण्यासाठी या शाळेची नियुक्ती करण्यात आली आहे.
खेड्यात शहरी सुविधा: राणे
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ठाणे सरकारी माध्यमिक विद्यालयाची आदर्श शाळा म्हणून नियुक्ती केल्याबद्दल आमदार डॉ. दिव्या राणे यांनी सर्व शिक्षक पालक, विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. हा प्रकल्प आदर्श ठरणार असून ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे,असे त्या म्हणाल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.