नानोड्यातील नव उद्योजकाला टाळेबंदीचा फटका

New entrepreneur in Nanoda hit by lockout
New entrepreneur in Nanoda hit by lockout

अस्नोडा,

जागतिक महामारीच्या ‘कोरोना’ संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी देशाला टाळेबंदीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. उद्योग जगतावर बंदीकाळ पसरल्याने मानवी जीवनाचे रोजचे रहाटगाडगे ठप्प झालेले आहे. रोजंदारीवर जगणाऱ्या अनेक कुटुंबांची, त्यांच्या रोजीरोटीची समस्या गंभीर बनलेली आहे. काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने व त्याचा लाभ गोमंतकीय मुलांना व्हावा, या उद्देशाने ‘नेचर ईन’ सारखा करमणुकीचा प्रकल्प उभा करण्याचा दृढनिश्चय केलेल्या नानोड्यातील युवा उद्योजकालाही टाळेबंदीचा मोठा फटका बसला आहे.
नानोडा येथील डोंगराने वेढलेल्या पडिक जमिनीचा योग्य वापर व्हावा तसेच याचा लाभ गोव्यातील विविध शाळांत शिकणाऱ्या मुलांना व्हावा, यासाठी ‘नेचर-इन’ नामक करमणुकीचा प्रकल्प उभारण्यात आला. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. याच्या जोडीला रंगीत इंटरलॉकिंग पेव्हर्स तयार करणारा छोटेखानी उद्योग प्रकल्पही उभारण्यात आला. यासाठी कर्ज काढून सुमारे ५० लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. परंतु टाळेबंदी लागल्यामुळे ही गुंतवणूक निष्काम ठरू लागल्याची खंत येथील तरुण उद्योजक समीर फळारी यांनी व्यक्त केली आहे.
नानोडा गावातील ‘नेचर इन’ या नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी व तेथील विविध पुरातन कलाकृती पाहण्यासाठी पर्यटन मोसमात अनेक शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अभ्यास दौरे होत असतात. देशी-विदेशी पर्यटकही या स्थळाकडे आकर्षित होत आहेत. अभ्यास दौरे आणि पर्यटकांच्या येण्यामुळे या ठिकाणच्या सोयी सुविधा अपुऱ्या पडू लागल्या. त्यात भर घालण्यासाठी नवे दोन जलतरण तलाव निर्माण करण्यात आलेले आहेत. शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यास दौरे, देशी-विदेशी पर्यटकांना चांगल्या सोयीसुविधा मिळण्यावर या ठिकाणी बराच खर्चही करण्यात आलेला आहे. परंतु पर्यटन मोसमातच टाळेबंदीला सामोरे जावे लागल्याने त्याचा परिणाम म्हणून नेचर इन व पेवर्स उद्योगाला मोठा फटका बसला असल्याचे उद्योजक समीर फळारी यांनी सांगितले.
उद्योगातील कामगार परप्रांतीय असल्यामुळे त्यांना त्यांच्या गावी पाठवणेही कठीण झालेले असून, विनाकाम कामगारांना पोसावे लागत आहे. नेचर-इन व पेव्हर्स उद्योग यांसारखे राज्यातील अनेक उद्योग व तारांकित हॉटेल्स यांच्या उद्योगांवर संक्रांत आलेली आहे. टाळेबंदीचा काळ कधी संपतो आणि आपले उद्योग कधी सुरू होतात, याकडे उद्योजकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.


‘नेचर-इन’ व पेवर्स उद्योग यांना अधिकाधिक चांगल्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी कर्ज काढून गुंतविलेल्या ५० लाख रुपयांचा परतावा मिळण्याअगोदरच हा उद्योग आर्थिक समस्यांच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. शाळा कॉलेज बंद, वाहतुकीवर निर्बंध यामुळे ‘नेचर इन’ व पेवर्स उद्योग या ठिकाणी होणारे शैक्षणिक अभ्यास दौरे होत नसल्याने सद्यःस्थितीत मोठे नुकसान सोसावे लागत आहे. कर्ज काढून उद्योग चालविण्याचे धाडस केले असले तरी कर्जाचे हप्ते वाढत असल्याने परिस्थिती भयावह बनली आहे.
- समीर फळारी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com