मडगावातील न्यू मार्केट खुले

तुकाराम गोवेकर
मंगळवार, 28 जुलै 2020

व्यापाऱ्यांच्या दोन गटात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मडगावचे न्यू मार्केट आज दुपारी खुले करण्यात आले.

नावेली

व्यापाऱ्यांच्या दोन गटात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मडगावचे न्यू मार्केट आज दुपारी खुले करण्यात आले. सकाळी पालिकेने मार्केटच्या फाटकाची चावी न दिल्याने काही वेळ वातावरण तंग बनले. तथापि, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून नगराध्यक्ष पूजा नाईक यांनी मार्केट खुले करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला.
मार्केटमधील एका हॉटेल मालकाचा कोरोनाने झालेला मृत्यू व दोघे व्यापारी तसेच हॉटेलमधील पाच वेटर पाॅझिटीव्ह आढळल्याने व्यापाऱ्यांनी आठ दिवस मार्केट बंद ठेवले होते. व्यापाऱ्यांनी तसेच मार्केटशी संबंधीत नागरिकांनी आपली स्वॅब चाचणीही करून घेतली. या चाचणीत अनेकांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, तर काही जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. या स्थितीच्या पार्श्वभूमीवर मार्केट पुन्हा कधी सुरु करायचे यावरून व्यापाऱ्यांच्या दोन गटात वाद झाला. एका गटाचा आजपासून मार्केट सुरू व्हावे, असा तर दुसऱ्या गटाचा ३१ जुलैपासून मार्केट सुरु करण्यात यावे, असा अग्रह होता.
मार्के आजपासून सुरु करण्याचा आग्रह असलेले व्यापारी आज सकाळी मार्केटमध्ये आले असता मार्केटचे फाटक बंद असल्याने त्यांनी नगराध्यक्षांची त्यांच्या कक्षात भेट घेतली व मार्केट खुले करण्याची मागणी केली. देविदास बोरकर, दिलीप कोटे, प्रसाद रायकर, जाफर बुधानी (नगरसेवक) उमेश तिळवे, दामोदर फडते, महमद रफीक या व्यापाऱ्यांचा यात समावेश होता. या व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर नगराध्यक्षांनी जिल्हाधिकारी अजित रॉय यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली व मार्केट खुले करण्यास व्यापाऱ्यांना परवानगी दिली.
`मार्केट आठ दिवस बंद होते. त्यामुळे लॉकडाऊन कऱण्याची आवश्यकता नाही. कोणालाही कोरोनाची लक्षणे असल्यास त्याची चाचणी करता येईल. पण, मार्केट बंद ठेवण्याची आवश्यकता नाही, असे जिल्हाधिऱ्यांनी सांगितल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली.
एका रांगेतील व्यापाऱ्यांनी एका दिवशी तर दुसऱ्या रांगेतील व्यापाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी दुकाने खुली कऱण्याच्या पद्धतीनुसार आजपासून दुकाने खुली कऱण्यात आली. पुढील आठवड्यापासून सर्व दुकाने एकाच दिवशी उघडण्यास पालिकेने परवानगी द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी नगराध्यक्षांकडे केली आहे. यावर आपण चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी आपण पालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्षा जवळ संपर्क साधून जे व्यापारी दुकाने सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना सुरु करण्यास द्यावीत, असे सांगितले. मात्र आपण व इतर अनेक व्यापारी शुक्रवार दिनांक ३१ जुलै पासून दुकाने सुरू करणार आहोत. ज्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू केली आहेत, त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन शिरोडकर यांनी केले आहे.

गांधी मार्केट तीन दिवस बंद
गांधी मार्केटमध्ये एक व्यापारी कोरोना संक्रमित सापडल्याने सोमवारपासून तीन दिवसासाठी हे मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. मार्केट ३० जुलै रोजी खुले करण्यात येणार आहे असे गांधी मार्केट भाजी व तयार कपडे विक्रेते संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांनी सांगितले.सोमवारी संपूर्ण मार्केटचे निर्जतुकिकरण करण्यात आले असून मार्केट सुरू करण्या पूर्वी पुन्हा एकदा निर्जतुकिकरण करण्यात येईल असे आजगावकर यांनी सांगितले
.

संपादन - संजय घुग्रेटकर

संबंधित बातम्या