दक्षिण गोव्यातील जिल्हा इस्पितळ कोविड रुग्णांसाठी सज्ज

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

राज्यात गुरुवारी आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा बळी गेल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली. दरम्यान आजच्या दिवशी ४२४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून ३५० कोरोनामुक्त झाले आहेत.

पणजी: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले मडगाव येथील दक्षिण गोवा सरकारी जिल्हा इस्पितळ अखेर १ सप्टेंबरपासून कार्यरत करण्यात येणार आहे. हॉस्पिसियो रुग्णालयाची इमारत आता कोविड पॉझिटिव्ह असणाऱ्या प्रसुतीपूर्व आणि प्रसूती पश्चात रुग्णांसाठी वापरली जाणार आहे. ही उपाययोजना आम्ही कोविडशी दोन हात करण्यासाठी मडगाव येथे वाढत्या रुग्णांच्या आकड्याला पाहून केल्याचे ट्विट आरोग्‍यमंत्री मंत्री विश्‍वजित राणे यांनी केले आहे. 

राज्यात गुरुवारी आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा बळी गेल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली. दरम्यान आजच्या दिवशी ४२४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून ३५० कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या ३९१० इतके सक्रिय कोरोनाचे रुग्ण असून आजच्या दिवसातील ५११ जणांचे कोरोना अहवाल प्रतीक्षेत आहेत. 

सचिवालयातील कर्मचारी रजेवर
सचिवालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयांचे निर्जंतुकीकरण करावे, कोविडचा संसर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी करावी या मागणीसाठी काल काम बंद आंदोलन केल्यानंतर आज अनेकांनी रजा घेणे पसंत केले. सचिवालयात आज कर्मचाऱ्यांची तुरळक उपस्थिती होती. शनिवारी गणेश चतुर्थी असल्याने आजपासूनच रजेवर जाणे अनेकांनी पसंत केले. सचिवालयातील कर्मचाऱ्यांना कोविड रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी होत नसल्याने कर्मचाऱ्यांत घबराट आहे. सुरक्षित अंतर ठेवून बैठकव्यवस्था करण्याविषयीही सर्वसाधारण प्रशासन खात्यात हालचाली सुरू झाल्या आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी साधला कोरोनामुक्तांशी संवाद
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज कोरोनामुक्त झालेल्‍यांबरोबर संवाद साधला. कोरोनाबाबत अनेक गैरसमज आहेत. ते आपण सर्वांनी दूर केले पाहिजेत. ज्यांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला, त्‍यांनी प्रकृती सांभाळली पाहिजे, असेही मुख्‍यमंत्र्यांनी संवादादरम्‍यान सांगितले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्याबाबतीत असणाऱ्या गैरसमजांना कमी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि मुख्यसचिव परिमल राय यांनी कोविडमुक्त झालेल्‍या रुग्णांबरोबर संवाद साधून लोकांच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी अनेकांनी त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये आलेल्या अनुभवाबद्दल माहिती दिली. काहींनी तेथे असणाऱ्या आठवणी आणि आरोग्यसेवकांनी दिलेल्या भक्कम आधाराबद्दल माहिती दिली.

उत्पल पर्रीकर कोरोनामुक्त
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे गुरुवारी कोरोनामुक्त झाले. त्‍यांना इस्‍पितळातून डिस्चार्ज दिला आहे. पुढील सात दिवस ते घरी क्वारंटाईन राहणार असल्याची माहिती त्‍यांनी दिली. उत्पल पर्रीकर यांना काही दिवसांपूर्वी कोरडा खोकला आणि ताप येत होता. त्यामुळे त्यांनी कोविड पडताळणी चाचणी करून घेतली होती, या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ते होम आयसोलेशनमध्ये होते. त्यांनतर ते इस्‍पितळात दाखल झाले होते. उपचारानंतर ते आज कोरोनामुक्त झाले. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या