गोवेकरांनो नियम मोडण्याआधी जाणून घ्या नवा वाहतुक कायदा

दैनिक गोमंतक
मंगळवार, 6 एप्रिल 2021

वाहतूक नियमभंगप्रकरणी 1 ते 10 हजार रुपये दंडाची तरतूद असणाऱ्या मोटर वाहन कायद्याची दुरुस्ती 1 मेपासून राज्यात लागू केली जाणार आहे.

पणजी: वाहतूक नियमभंगप्रकरणी 1 ते 10 हजार रुपये दंडाची तरतूद असणाऱ्या मोटर वाहन कायद्याची दुरुस्ती 1 मेपासून राज्यात लागू केली जाणार आहे. सरकारने आज राजपत्रात त्याविषयी अधिसूचना प्रसिद्ध करून 16 एप्रिलपासून हा कायदा लागू होईल, असे म्हटले असले तरी त्या तारखेत दुरुस्ती केली जाईल, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले आहे.
गुदिन्हो म्हणाले, नवा मोटर वाहन कायदा 16 एप्रिलपासून लागू करण्याचा जुना निर्णय आहे. त्यानुसार नियम अधिसूचित केले आहेत. मात्र त्‍यानंतर 1 मे पासून कायदा लागू करण्याचे ठरवण्यात आले आहे. अधिसूचनेत तशी दुरुस्ती करण्यात येणार आहे. 7 एप्रिलपासून याविषयी जनजागृती केली जाणार आहे. जनतेसमोर, महाविद्यालयात सादरीकरण करण्यात येणार आहे. वाहतूक नियम मोडू नका, या संकल्पनेवर ही जनजागृती असेल. नियम पाळा, दंड टाळा असे आम्ही सर्वांना सांगणार आहोत. (New transport law will come into force from May 1 in Goa )

बाणावलीत आरोग्य केंद्र उभारणार - चर्चिल आलेमाव

राज्यातील रस्ते (Road) दुरुस्त होईपर्यंत हा कायदा लागू केला जाणार नाही, असे सरकार गेले वर्षभर सांगत आले होते. अर्थसंकल्पीय भाषणावेळी चार महिन्यांत सर्व रस्ते दुरुस्त करण्याचे नियोजन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी बोलून दाखवले आहे. काही ठिकाणी रस्ता डांबरीकरणाची कामे सुरु झाली आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर ही कायदा दुरुस्ती लागू केली जात आहे. सुरवातीला केंद्र सरकारने (Central Goverment) सुचवले तरी तेवढा दंड राज्यात आकारला जाणार नाही. किमान दंड आकारू, असे सरकार सांगत आले असले, तरी आज प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार हा दंड वाहन चालकांचा खिसा फाडणारा असेल हे स्पष्ट झाले आहे. काही गुन्ह्यांत दंडाची रक्कम पाचपट वाढवण्यात आली आहे.

असे असतील नवे दंड :-
वाहनांत नियमबाह्य बदल केला असल्यास 1 लाख रुपये दंडाची तरतूद या नव्या कायद्यात आहे. बस मालकांनी तिकीट न दिल्यास पहिल्या गुन्ह्यावेळी 500 रुपये तर त्यानंतरच्या गुन्ह्यावेळी 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. वेग मर्यादा ओलांडल्यास हलक्या वाहनांच्या चालकांना दीड हजार रुपये तर इतर वाहन चालकांना 4 हजार रुपये दंड असेल. याशिवाय वाहन चालक परवाना जप्त करून तो निलंबित करण्याचीही कारवाई केली जाणार आहे. क्रमांकपट्टीशिवाय दुचाकी चालवल्यास दोन हजार रुपये, तीनचाकीसाठी 2 हजार रुपये, हलक्या वाहनांसाठी तीन हजार रुपये तर इतर वाहनांसाठी 5 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. वाहन नोंदणी प्रमाणपत्र निलंबित वा रद्द झाले असतानाही ती दुचाकी व रिक्षा चालवल्यास 2 हजार रुपये, हलक्या वाहनांसाठी 3 हजार रुपये तर इतर वाहनांसाठी 5 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. वाहनांत जादा माल भरल्यास 20 हजार रुपये व टनामागे 2 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. दुचाकीवर आणखीन दोन जणांना बसवून प्रवास केल्‍यास 1 हजार रुपये दंड व तीन महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबन अशी कारवाई होणार आहे.

संबंधित बातम्या