गोव्यात भाजपचा ‘ॲक्शन प्लॅन’

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

जिल्हा पंचायत निवडणूक आणि पालिका निवडणूक होऊ घातलेली असताना विरोधकांना जेथल्या तिथे रोखण्यासाठी भाजपने कृती आराखडा तयार केला आहे. यामुळे येत्या काही दिवसात भाजपकडून विरोधी पक्षांवर शाब्दीक हल्ले झालेले पाहावयास मिळणार आहे.

पणजी : जिल्हा पंचायत निवडणूक आणि पालिका निवडणूक होऊ घातलेली असताना विरोधकांना जेथल्या तिथे रोखण्यासाठी भाजपने कृती आराखडा तयार केला आहे. यामुळे येत्या काही दिवसात भाजपकडून विरोधी पक्षांवर शाब्दीक हल्ले झालेले पाहावयास मिळणार आहे. कॉंग्रेस सरकारच्या काळात झालेले गैरव्यवहारही यातून डोकावणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि संघटन सचिव सतीश धोंड यांच्यात आज रात्री झालेल्या बैठकीत या कृती आराखड्याला अंतिम रूप देण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी एखादा निर्णय घेतल्यावर कोणत्या मंत्र्यांकडून त्यांची पाठराखण केली जाते, कोण सोयीस्करपणे मौन बाळगतो याची चर्चाही या बैठकीत झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार होते. त्यांच्यासमोर सद्यस्थिती मांडण्याची त्यांनी तयारी केली होती. पक्षीय पातळीवर राजकीय निर्णयांना पाठिंबा आहे हे दर्शवणाऱ्यासाठी या दौऱ्यात तानावडे यांचा समावेश मुद्दामहून करण्यात आला होता. मात्र, बिहार निवडणूक निकालामुळे शहा यांची भेट होऊ शकली नाही. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी दूरध्वनीवर तेवढा संपर्क झाला. त्यामुळे महत्वाचे राजकीय निर्णय लांबणीवर टाकावे लागले आहेत.

यामुळे आता जिल्हा पंचायत व पालिका निवडणुकांना सामोरे जाताना तसेच मगो आणि गोवा फॉरवर्डकडून संघटनात्मक कामाला गती देण्यात येत असताना भाजपने केवळ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरांपुरते मर्यादीत न राहण्याचे ठरवले आहे. विरोधकांची पोलखोल करण्यासाठी अगदी तालुका पातळीवर आक्रमक स्वरूपात मुद्दे मांडण्याचे ठरवण्यात आले आहे.

राज्यासमोर आज निर्माण झालेल्या समस्यांचा उगम हा कॉंग्रेसच्या काळात कसा झाला होता याची माहिती जनतेसमोर पोचवली जाणार आहे. कोळसा वाहतूक कोणी सुरू केली, लोहमार्गाचे दुपदरीकरण कोणी मंजूर करून आणले आदी मुद्दे लोकांसमोर विस्तृत स्वरूपात मांडले जाणार आहेत. तानावडे यांनी आज पत्रकार परिषदेत जनतेने कॉंग्रेस नेत्यांच्या तोंडाला कोळसा फासावा असे थेट आवाहन करून भाजपने आता बदल स्वीकारल्याची चुणूक दाखवली आहे. या खेपेला भाजप पक्ष संघटना आणि राज्य सरकार यांच्यात बऱ्यापैकी असलेल्या समन्वयातून हा आक्रमकपणा मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेपर्यंत पोचणार आहे. कॉंग्रेस सध्या काही नेते कार्यकर्ते यांच्या बळावर आपले अस्तित्व टिकवून आहे. त्यामुळे भाजपने चहुबाजूने मुद्यांचा मारा करण्याचे ठरवल्यास त्यातून राजकीय वावटळ निर्माण होईल असे वातावरण सध्या आहे. 

गोवा व दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे ट्विटरयुद्ध
भाजपने आक्रमक रूप धारण करण्याचे ठरवल्याचा प्रत्यय सकाळीच आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात ट्विटरवर शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. केजरीवाल यांनी ट्विटरवरून गोव्यामध्ये प्रदूषण आता वाढणार आहे, कोळसा वाहतूक वाढणार आहे, तेथील जंगल वाचवलं पाहिजे, केंद्र सरकार हे प्रकल्प राज्यावर लादत आहे. याला विरोध करणाऱ्या जनतेसोबत सर्वांनी उभे राहावे, असे आवाहन केले. त्याला प्रत्युत्तर देताना डॉ. सावंत यांनी गोव्यातील प्रदूषण रोखण्यासाठी गोवा सरकार सक्षम आहे. उपाययोजना केली जात आहे. केजरीवाल यांनी गोव्यासारखेच प्रदूषणमुक्त वातावरण दिल्लीतील जनतेला द्यावे, दिल्लीतील जनतेची तशी अपेक्षा आहे, असा टोला लगावला. 

मंत्री, आमदार, नेत्यांनीच वक्तव्ये करण्याचा निर्णय
भाजप पक्षाच्या ध्येय धोरणानुसार मंत्री, आमदार आणि नेत्यांनी वक्तव्ये करावीत असे ठरवण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींनी  कोणत्याही आंदोलनाच्या मंचावर जाण्यापूर्वी पक्षाला कल्पना द्यावी व पक्षाची अधिकृत भूमिका समजावून घ्यावी. पक्षाची भूमिका एक आणि नेत्यांची दुसरी असे होऊ नये. नावशी येथील मरीनाच्या सभेवेळी सांतआंद्रेचे आमदार फ्रांन्सिस सिल्वेरा यांना स्थानिकांनी मंचावर येण्यास निमंत्रित केले होते. तेथे झालेल्या काही घटनांची नोंद भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आणि असे प्रकार टाळावेत यासाठी सिल्वेरा यांना पाचारण करून मार्गदर्शनही केले आहे.

संबंधित बातम्या