वखार चालकावर जीवघेणा हल्ला; पोलिसांकडून नऊजणांना अटक

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

दरम्यान, यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल होताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत अवघ्या दोन तासांत नऊ संशयितांना गजाआड केले.

शिवोली: बुधवारी संध्याकाळी वखारीतील लाकूड खरेदीवरून झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाल्याने चिवार - हणजूण येथील वखार चालक दयालाल पटेल (५४ वर्षे) त्यांचे सहकारी मुनीलाल पटेल (५४) भरत पटेल (२७ वर्षे) सर्वजण मूळ गुजरातचे, सध्या राहाणारे पर्रा-बार्देश, तसेच त्यांचे दोन कामगार यांच्यावर स्थानिक तरुणांकडून जीवघेणा हल्ला झाल्याची तक्रार हणजूण पोलिस स्थानकात दाखल झाली आहे. दरम्यान, यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल होताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत अवघ्या दोन तासांत नऊ संशयितांना गजाआड केले.

कायसूव -हणजूण येथील व्यवसायिक वाटू वासू गोवेकर यांच्या मालकीची चिवार -हणजूण येथील सरस्वती सॉ- मील ही वखार गेली अनेक वर्षे पटेल हे भाडेपट्टीवर चालवत आहेत. बुधवारी दुपारी साडेतीन ते चार वाजण्‍याच्या दरम्यान, मुणांगवाडा -आसगाव येथील आंतोनियो डिसोझा व कुटुंबिबीय आपल्या नवीन रेस्टॉरंटच्‍या बांधकामासाठी लागणारे लाकडी साहित्य खरेदी करण्यासाठी पटेल चालवीत असलेल्या वखारीकडे आले होते. यावेळी लाकडी साहित्याची जमवाजमव केल्यानंतर ठरलेल्या लाकडाच्या किमतीवरून मुनीलाल पटेल तसेच डिसोझा यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. 

या घटनेशी संबंधित नऊ संशयितांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. संशयित आंतोनियो डिसोझा (५४) ॲलन डिसोझा (२५) आसगाव, फेबियर गोहार (कांदोळी), सुरेश पुजारी (कांदोळी), ज्योवीन रोडलिनो (रॉड्रिग्‍ज) कार्मोणा-सासष्टी, अझर शेख (मुंबई), इम्रान खान (कळंगुट) तसेच श्रीमती शेवार्ट डिसोझा तसेच एका अल्पवयीन तरुणाचा अटक केलेल्यांत समावेश आहे. 

अखिल गोवा वखार असोसिएशनच्‍या पदाधिकाऱ्यांनी हणजूण पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक कोरगावकर यांची भेट घेत  बुधवारी झालेल्या हल्ल्यासंबंधात सविस्तर चर्चा केली. या घटनेनंतर हणजूण पोलिसांनी त्‍वरित कारवाई करीत आठ संशयितांना ताब्यात घेतल्याबद्दल ऑल गोवा वखार असोसिएशनकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

‘घाटी’ म्‍हटले आणि ठिणगी पडली!
डिसोझा कुटुंबियांकडून पटेल यांना ‘घाटी’ हा अपशब्द वापरण्यात आल्याने प्रकरण तापले. यावेळी पटेल यांनी आपल्या मजुरांच्या सहाय्याने डिसोझा कुटुंबियांवर सर्वप्रथम हल्ला चढवीत तसेच त्यांच्या कारगाडीची नासधूस करीत त्यांना तेथून पिटाळून लावल्याचा आरोप आंतोनियो डिसोझा कुटुंबियांकडून करण्यात आला. या घटनेचा बदला घेण्याच्या दृष्‍टीने डिसोझा  कुटुंबियांनी आपल्या मित्रांच्या मदतीने दुपारी साडेचार वाजता पटेल व वखारीतील अन्य कर्मचाऱ्यांवर प्रतिहल्ला केला. तेथील कर्मचाऱ्यांना बदडून काढले. यावेळी पटेल यांच्या डोक्यावर दंडुक्यांनी जबर प्रहार करण्यात आल्याने ते निपचित पडले होते. मारहाण केल्‍यानंतर डिसोझा कुटुंबियांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पटेल यांची प्रकृती गंभीर
वखारीचे मूळ मालक वाटू वासू गोवेकर यांच्याकडून हाणामारीची रितसर तक्रार हणजूण पोलिसांत दाखल करण्यात आली. तक्रारीची दखल घेत हणजूणचे पोलिस निरीक्षक सूरज गावस तसेच उपनिरीक्षक पार्सेकर यांनी त्‍वरित घटनास्थळी भेट देत जखमी पटेल व त्‍यांच्‍या नातेवाईकांच्या साहाय्‍याने उपचारासाठी म्हापशातील एका खासगी इस्पितळात दाखल केले. पटेल यांची तब्येत गंभीर असून त्यांच्यावर इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या