सासष्‍टीत अठरा महिन्‍यांत नऊ खून

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 मार्च 2021

मडगावसह सासष्टीत गेल्या दीड वर्षांत नऊ खून प्रकरणे घडली आहेत. यात मडगावचे सराफ स्वप्नील वाळके या गाजलेल्या खून प्रकरणाचा समावेश आहे.

सासष्टी : मडगावसह सासष्टीत गेल्या दीड वर्षांत नऊ खून प्रकरणे घडली आहेत. यात मडगावचे सराफ स्वप्नील वाळके या गाजलेल्या खून प्रकरणाचा समावेश आहे. चिडवल्याच्या रागाने, पूर्ववैमनस्य, दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय अशा कारणांसोबत दारू न दिल्याच्या रागातही खून करण्याचा प्रकार घडला आहे. 

मध्यवर्ती मडगावात 2 सप्टेंबर 2020 रोजी दिवसाढवळ्या तरुण सराफ स्वप्नील वाळके यांचा त्यांच्या दुकानात सुऱ्याने खूपसून व गोळी झाडून खून करण्यात आला होता. याप्रकरणात ओमकार पाटील, मुस्तफा शेख आणि एव्हेंडर रॉड्रिगीस यांच्यासह शाणी कुमार, राहुल कुमार आणि कुंदन कुमार यांच्यावर शस्त्र बाळगल्‍याबद्दल आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या खटल्याची सुनावणी दक्षिण गोवा सत्र न्यायालयात सुरू आहे. दुकानात चोरीसाठी आलेल्या संशयितांनी सराफ व्यावसायिक स्वप्नील वाळके यांचा भरदिवसा पोटात सुरा खुपसून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित ओमकार पाटील, मुस्तफा शेख आणि एव्हेंडर रॉड्रीगिस यांना अटक केली. नंतर इतर संशयितांना अटक करण्यात आली. भरदिवसा मध्यवर्ती मडगावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण गोवा हादरून गेला होता.  

मित्राला संपविले
सतत चिडवत असलेल्या मित्राचा कुऱ्हाडीने वार करून खून करण्याची घटना राय येथे घडली होती. मे 2020 मध्ये हे खून प्रकरण घडले. विवेक देवसिंग याने त्याचा मित्र गजेंद्र सिंग हा झोपेत असताना त्याच्यावर कुऱ्हाडीचा वार केला होता. मुकेश सतत चिडवित असल्याच्या रागात हा खून केल्याची कबुली विवेकने दिली होती. दोघेही झारखंड येथील हे मित्र कोल्याडोंगर - राय येथे एका खोलीत भाडेकरू म्हणून राहात होते.  

वर्लीत पूर्ववैमनस्‍यातून खून

28 मे 2020 रोजी दवर्ली येथे पूर्ववैमन्यसातून एका तरुणाचा खून होण्याची घटना घडली. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. महमद जावेद व मुजाहीद खान या२ मित्रांचे व सादीक व इस्माईल यांच्याशी भांडण झाले. यात मुजाहीद खान याला सुऱ्याने भोसकण्यात आले. दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रियकराने आपल्या प्रेयसीचा खून करण्याची घटना 24 एप्रिल 2020 रोजी बाणावली येथे घडली. या प्रकरणी मेलबर्न रॉड्रिग्ज (22 वर्षे) याला कोलवा पोलिसांनी अटक केली.

दारू न दिल्‍याने खून

दारू न दिल्याच्या रागात दोघांचा खून होण्याचा प्रकार एसजीपीडए मार्केटजवळ घडला. 2 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री साडेबाराच्या दरम्यान घडलेल्या या घटनेत अर्जुन कांजीदोणी याला अटक केली. बार बंद झाल्यानंतर बाहेर दारू पिणाऱ्या तिघां मजुरांच्या गटाने दारू देण्यास नकार दिल्याने अर्जुन याने रवी व भीम या दोघां मजुरांचा डोक्यांवर बाटल्या फोडून खून केला. पारोडा येथे 4 डिसेंबर 2019 रोजी मिनिन ऑॅलिव्हेरा याचा, तर मालभाट येथे 10 डिसेंबर 2019 रोजी साधुच्या वेषातील एका भिकाऱ्याचा खून झाला होता. आपल्याच पोटच्या अडीच वर्षाच्या मुलीचा मातेकडूनच खून होण्याची दुर्दैवी घटना बेतालभाटी येथे 17 सप्टेंबर 2019 रोजी घडली होती.

संबंधित बातम्या