गोव्यातील बसगाड्यांमधील निर्माल्याची कचराकूंडीत विल्हेवाट

 Nirmalya Kalash will turn into a garbage can if we keep it in market
Nirmalya Kalash will turn into a garbage can if we keep it in market

म्हापसा: गोव्यातील खासगी बसगाड्यांमध्ये असलेल्या देवदेवतांच्या प्रतिमांना नित्यनेमाने पुष्पाहार घातले जात असले तरी दुसऱ्या दिवशी कोमेजलेल्या त्या पुष्पमालांचे अर्थात त्या निर्माल्याचे पावित्र राखून त्याचे मनोभावे विसर्जन करण्याबाबत बसवाहक उदासीन असल्याचे दिसून येते, असे मत पुरोहितांनी व्यक्त केले आहे.

निर्माल्याचे विसर्जन मनोभावे करणे आवश्यक असताना बहुतांश बसगाड्यांवरील वाहक निर्माल्य ‘विसर्जित’ करण्याऐवजी त्याची कुठेतरी एकदाची ‘विल्हेवाट’ लावण्याची कृती करीत असतात. म्हपसा बसस्थानकावर तर अशा पुष्पमाला कुठेही टाकल्या जात असल्याने साहजिकच त्या पायदळी तुडवल्या जात आहेत.


या विषयासंदर्भात संपर्क साधला असता, हे निर्माल्य कुणाच्या तरी पायांखाली जाऊ नये याची दक्षता घेणे अत्यावश्यक असल्याचे मत म्हापसा परिसरातील काही पुरोहितांनी व्यक्त केले. दरम्यान, गावोगावी मोक्याच्या ठिकाणी पवित्र धार्मिक स्थानांवर सरकारने निर्माल्य कलशांची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.


हे निर्माल्य वाहत्या पाण्यात, तुळशीवृंदावनात अथवा परिसर स्वच्छ असलेल्या एखाद्या झाडाच्या मुळाशी विसर्जित असल्याची प्रथा-परंपरा आहे; तथापि, आजच्या धावत्या युगात त्याबाबतचे संकेत बहुतांश भाविक गांभीर्याने पाळणे शक्य नाही, असे मतही त्या पुरोहितांनी व्यक्त केले आहे. सध्या निर्माल्याच्या विसर्जनासाठी पुरेशी जागाच उपलब्ध नसल्याने बसस्थानकांवर अथवा गावांतील व शहरांतील प्रमुख धार्मिक ठिकाणी कामस्वरूपी निर्माल्य कलशांची व्यवस्था सरकारने करणे आवश्यक असून, त्या निर्माल्याचे यथाविधी विसर्जनही करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे जतनाशी आणि जनतेच्या धार्मिक भावनांशी हा विषय निगडित असल्याने हा थोडासा गुंतागुंतीचा असलेला विषय सरकारने स्वत: पुढाकार घेऊन सोडवावा, असे मत पुरोहित मंडळीने व्यक्त केले आहे. अन्यथा, सर्वसामान्य लोक असे निर्माल्य कुठेही फेकून देतील व त्यामुळे देवदैवतांचा अवमान तर होईलच व त्याचबरोबर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या कार्यातही बाधा निर्माण होईन, असे त्यांचे म्हणणे आहे.


प्रदूषणाला आळा घालण्याच्या उद्देशाने म्हापसा पालिकेने भाविकजनांच्या सोयीसाठी म्हापसा येथील तार नदीच्या परिसरात निर्माल्य कलश उपलब्ध करून दिले आहेत; परंतु, त्या कलशांमधील निर्माल्याची विल्हेवाट चक्क कचरा विल्हेवाट प्रकल्पात लावली जात आहे, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. निर्माल्याचे यथाविधी विसर्जन न करता म्हापसावासीय भाविकजनांच्या मनोभावना पायदळी तुडवून पालिका अशा पद्धतीने निर्माल्याची अक्षरश: विल्हेवाट लावत असते, असे यासंदर्भात बोलताना सुदेश तिवरेकर यांनी सांगितले.


दरम्यान, बाजारपेठांत निर्माल्य कलश ठेवल्यास त्यांचे रूपांतर कचरापेट्यांत होऊ शकते व त्यामुळे केवळ धार्मिक स्थळांच्या प्रांगणांत, निदीच्या किनारी, तसेच मंदिरे, तलाव, वटवृक्ष, पिंपळवृक्ष यांच्या परिसरात अशा निर्माल्य कलशांची व्यवस्था करून त्यासंदर्भातील विसर्जन योग्य प्रकारे होते की नाही, हे पाहणे भारतीय धार्मिक परंपरेचे जतन-संवर्धन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे भाविकजनांचे म्हणणे आहे.
सध्या बहुतांश बसवाहक वाहन सुरू असतानाच पुष्यमालांच्या स्वरूपातील निर्माल्य आणि अगरबत्तीचे छोटेखानी कागदी खोके नदीत फेकून देण्याचे कृत्य दररोज करीत असतात. बेती-पणजी येथे मांडवी नदीत, शिवोली-चोपडे येथे व कोलवाळ-महाखाजन येथे शापोरा नदीत, अस्नोडा नदीत, बस्तोडा भागातील तार नदीत अशा घटना दररोज शेकडो खासगी बसचालक तथा अन्य वाहनचालकांच्या करवी होत असतात. त्यामुळे नदीच्या प्रदूषणातही भर पडत आहे. आपली सर्व दैवते पर्यावरणप्रिय असल्याने अशा प्रकारे पर्यावरणाची हानी करणे योग्य नव्हे, असे मत गिरवडे-बार्देश येथील एक पद्मनाभ संप्रदायातील शिष्य असलेली व्यक्ती गुरुदास गावडे यांनी व्यक्त केले आहे.

आणखी वाचा:

कोणत्याही परिस्थितीत निर्माल्य माणसाच्या पायांखाली येऊ नये व त्याचे विसर्जन मनोभावे पवित्र ठिकाणी व्हावे असा धार्मिक संकेत आहे. त्यामुळे प्रत्येक भाविकजनाने हे तत्त्व पाळणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत पर्यावरणाचे जतन-संवर्धन करण्याच्या हेतूने तसेच धार्मिक रीतिरिवाज अबाधित राखण्याच्या हेतूने निर्माल्याच्या विसर्जनाबाबत भाविकांची वैयक्तिक जबाबदारी आहेच. त्याचबरोबर सरकारनेही त्या दृष्टीने जनमानसाच्या धार्मिक भावना विचारात घेऊन योग्य उपाययोजना काढण्यास पुढाकार घ्यावा.
- राजू केळकर, पुरोहित

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com