यंदा गोव्यातील ‘एनआयटी’ होणार पूर्ण तर ‘आयआयटी’प्रकरणी सरकार सावध

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी येथे एनआयटीचे संकुल उभारण्याच्या कामाने मात्र गती घेतली असून यावर्षी ते संकुल पूर्ण होण्याची शक्यता आहे. गोव्यात आयआयटी संकुलासाठी जागा निश्चित करण्यासाठी सरकार आता चार जणांची समिती नेमणार आहे.

पणजी: राज्यात आयआयटीसाठीच्या जागेला सगळीकडेच विरोध होत आहे. त्यामुळे अद्याप जागा नििश्‍चत झालेली नाही. परंतु दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी येथे एनआयटीचे संकुल उभारण्याच्या कामाने मात्र गती घेतली असून यावर्षी ते संकुल पूर्ण होण्याची शक्यता आहे. ही एक जमेची बाजू आहे.

‘आयआयटी’प्रकरणी सरकारची सावधगिरी

गोव्यात आयआयटी संकुलासाठी जागा निश्चित करण्यासाठी सरकार आता चार जणांची समिती नेमणार आहे. दक्षिण गोवा दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ही माहिती दिली. 

फर्मागुढी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  संकुलात आयआयटी सुरु आहे. लोलये येथे आयआयटी संकुलासाठी जागा निश्चित करण्याचा सरकारने प्रयत्न केला त्याला स्थानिकांनी विरोध केला. त्यानंतर सांगे तालुक्यात हा प्रकल्प हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथेही जागा निश्चिती करण्यात अडथळे आल्यानंतर सत्तरी तालुक्यातील मेळावली येथे सरकारी जागेत आयआयटीचे संकुल उभारण्याचे निश्चित करण्यात आले. त्याला गेले सात महिने ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर हा संकुल प्रकल्प सत्तरीबाहेर हलवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.

त्यामुळे आता आयआयटी संकुल  कुठे होणार याविषयी उस्तुकता आहे. मडगाव येथे मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, गोव्यात आयआयटी संकुल होणारच आहे. त्यासाठी जागा निश्चिती करण्यासाठी चार सदस्यीय समिती सरकार नेमणार आहे. ती समिती जागांची पाहणी करेल आणि योग्‍य जागा सुचवेल. पर्यावरणाचे रक्षण आणि जनतेचा विरोध या साऱ्याचा विचार ही जमीन ठरवताना केला जाणार आहे.

आणखी वाचा:

गोव्यातील नगरपालिका निवडणुक 3 महिन्यासाठी तहकूब -

संबंधित बातम्या