आणखी किती बळी घेणार?; नितीन फळदेसाईंचा संतप्त सवाल

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

सरकार कोरोना विषयावर गंभीर नाही हे स्पष्ट झाले आहे. सरकारला लोकांच्या जीवाचे काही देणेघेणे नाही अशा पद्धतीने आपल्या घोषणा करत आहे. सरकारला फक्त इफ्फीमधून होणारा फायदा  दिसतो. लोकांच्या जिवाची पर्वा नाही. इफ्फी पणजीत होणार असल्यामुळे ज्याप्रमाणे मुरगाव तालुक्यात कोरोनाचा प्रसार झाला, त्याप्रमाणे पणजीत मोठ्या प्रमाणात त्याचा फैलाव होणार आहे, अशी भीती श्री. फळदेसाई यांनी व्यक्त केली.

गोवा सुरक्षा मंचचा इफ्फीला विरोध

मुरगाव: राजकीय स्वार्थासाठी वास्को लॉकडाऊन न केल्यामुळे आतापर्यंत जवळजवळ ५० जणांचा बळी कोविडमुळे फक्त मुरगाव तालुक्यात गेला आहे. हे माहीत असतानाही आता इफ्फी पणजीत आणून सरकार किती लोकांचा बळी  घेणार आहे, असा संतप्त सवाल गोवा सुरक्षा मंचचे युवाध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी उपस्थित केला आहे.

सरकार कोरोना विषयावर गंभीर नाही हे स्पष्ट झाले आहे. सरकारला लोकांच्या जीवाचे काही देणेघेणे नाही अशा पद्धतीने आपल्या घोषणा करत आहे. सरकारला फक्त इफ्फीमधून होणारा फायदा  दिसतो. लोकांच्या जिवाची पर्वा नाही. इफ्फी पणजीत होणार असल्यामुळे ज्याप्रमाणे मुरगाव तालुक्यात कोरोनाचा प्रसार झाला, त्याप्रमाणे पणजीत मोठ्या प्रमाणात त्याचा फैलाव होणार आहे, अशी भीती श्री. फळदेसाई यांनी व्यक्त केली.

राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे पारंपरिक गणेशोत्सव साजरा करू नका असे आवाहन करीत आहेत, मग इफ्फी महोत्सव पणजीत का आयोजित केला जात आहे, असा सवाल श्री. फळदेसाई यांनी करून सरकारने दुटप्पीपणा करू नये असे सुचवले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. हे जाणून पणजीतील सुजाण नागरिकांनी इफ्फी महोत्सवाला कडाडून विरोध करून आपले आरोग्य सांभाळावे, असे आवाहन श्री. फळदेसाई यांनी पणजीकरांना केले आहे.

सरकारची आर्थिक स्थिती बिकट आहे असे प्रत्येकवेळी सरकारकडून सांगितले जात असताना इफ्फीसाठी करोडो रुपयांची उधळपट्टी  करण्याची तयारी भाजप सरकारने कशी काय आखली  आहे, असा सवाल श्री. फळदेसाई यांनी उपस्थित करुन इफ्फी आयोजनाला गोवा सुरक्षा मंचचा कडाडून विरोध असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या