‘त्या’ पार्टीत भाजपचे मंत्री नव्हते

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

दत्तप्रसाद नाईक म्हणाले, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर केवळ खोटे बोलत आहेत. १७ वरून ५ आमदार करण्याची किमया त्यांनी साधली आहे. चोडणकर यांनी काल छायाचित्रे दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

पणजी: अमलीपदार्थांचा वापर झालेल्या पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या कपिल झवेरी याच्या कोणत्याही कार्यक्रमात भाजपचे नेते, मंत्री सहभागी झाले नव्हते. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत मात्र सहभागी झाल्याची छायाचित्रे आहेत, असे भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर केवळ खोटे बोलत आहेत. १७ वरून ५ आमदार करण्याची किमया त्यांनी साधली आहे. चोडणकर यांनी काल छायाचित्रे दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या सर्वांना झवेरी अधिकृतपणे वेळ घेऊन भेटला होता. छायाचित्रात दिसलेल्यापैकी कोणीही त्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. माजी केंद्रीयमंत्री ॲड. रमाकांत खलप यांच्यासोबतची त्याची छायचित्रे सार्वत्रिक झाली आहेत. त्यामुळे जनतेने कॉंग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडू नये. सध्या राज्याला कठीण काळ आहे, तो मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सहन करत आहेत. आता सर्वांनी खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज आहे. ही वेळ आरोप प्रत्‍यारोप करण्याची नाही.

मडगावची माजी नगराध्यक्षही झवेरी यांच्यासोबतच्या छायाचित्रात दिसत आहेत. ती महिला कोणत्या पक्षाची होती हे चोडणकर यांनी सांगावे. कामत कसले तरी उद्‍घाटन करताना दिसत आहेत ते रेव्ह पार्टीचे उद्‍घाटन करत आहेत का. छायाचित्रात दिसत आहे ती चर्चा ती हप्त्यांविषयी होती का याचे उत्तर चोडणकर यांनी द्यावे. खरेतर मुख्यमंत्री सावंत यांचे त्यांनी अभिनंदन केले पाहिजे होते. त्यांनी पोलिसांना मुक्त हस्त दिल्यानेच पार्टीविरोधात ही कारवाई झाली हे समजून घेतले पाहिजे.

दिगंबर कामत सलग पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात अशा किती कारवाया पोलिसांनी केल्या ते चोडणकर यांनी सांगावे असे नाईक म्हणाले. कामत यांचे एकेकाळी विशेष कार्य अधिकारी असलेले प्रकाश वेळीप कपिल सर असे झवेरी याला फेसबुकवर संबोधतो. त्याचे व झवेरीचे नाते काय हेही चोडणकर यांनी सांगितल्यास बरे, असेही नाईक यांनी आवाहन केले.

उत्तर गोवा जिल्हा सरचिटणीस गिरीश उस्कैकर, दक्षिण गोवा जिल्हा सरचिटणीस सत्यविजय नाईक, पर्वरी मंडळ सरचिटणीस किशोर अस्नोडकर आदी मंचावर यावेळी होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या