पूनम पांडेच्या 'त्या' अश्लील व्हिडिओ प्रकरणी सात महिने उलटूनही आरोपपत्र नाही

सुशांत कुंकळयेकर
बुधवार, 9 जून 2021

चापोली अश्लील व्हिडीओ प्रकरण : पुण्यात पाठविलेल्या क्लिपच्या न्यायवैद्यक अहवालाची प्रतीक्षा 

मडगाव: पूनम पांडे हिच्या ज्या अश्लील व्हिडिओने गोव्यातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील मीडियामध्ये गदारोळ माजला होता त्या अश्लील व्हिडीओ प्रकरणाला सात महिने उलटून गेले तरी अजून आरोपपत्रही दाखल झालेले नाही. कारण ज्या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्याची हार्डडिस्क पुण्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवून दिली आहे त्यासंबंधीचा अहवाल अजून आलेला नाही. (No chargesheet in Poonam Pandeys Controversial video case even after seven months)

काणकोणचे पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांना यासंबधी विचारले असता, या वादग्रस्त क्लिपची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आम्ही सर्व सामग्री पुण्याला पाठवून दिली होती. त्या अहवालाच्या आम्ही अजून प्रतीक्षेत आहोत, असे त्यांनी सांगितले.

'अभी तो मै जवान हूं' अभिनेते धर्मेंद्र यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल...

संपूर्ण गोवा हादरवून सोडणारा हा विवादास्पद व्हिडिओ 3 नोव्हेंबर 2020 रोजी काणकोण येथील चापोली धरणावर शूट करण्यात आला. पोलिसांच्या दाव्याप्रमाणे पूनमचा पती सॅम बॉम्बे यानेच हे चित्रीकरण केले होते. यात पुनमचे विवस्त्रावस्थेत चित्रीकरण करण्यात आले होते. 4 नोव्हेंबर हा व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड झाल्यावर त्याचे संपूर्ण देशात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर निर्बंधित क्षेत्रात जाऊन हा अश्लील व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी पूनम व तिच्या पतीला माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 67-अ खाली अटकही झाली होती.

यासंबंधी बोलताना या प्रकरणाशी निगडित असलेल्या वकिलाने या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेतल्यास आतापर्यंत या प्रकरणी आरोपपत्र दाखल होऊन सुनावणी सुरू होणे गरजेचे होते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र कोविड परिस्थितीमुळे पोलिस कदाचित या तपासाला वेग देऊ शकले नसतील असे ते म्हणाले. मात्र या प्रकरणी आरोपपत्र दाखल होण्यास जेवढा उशीर होईल तेव्हढे हे प्रकरण पोलिसांच्या हातातून निसटणची शक्यताच अधिक असे ते म्हणाले.

...तर सात वर्षांची होऊ शकते कैद
या प्रकरणी पूनम व तिच्या वादग्रस्त पतीवर आयटी कायद्याच्या ६७ ‘अ’ खाली गुन्हा नोंद करण्यात आला असून, हा आरोप सिद्ध झाल्यास पूनम व तिच्या पतीला कमाल ५ वर्षापर्यंत कैद होऊ शकते. अशाच प्रकारचा गुन्हा दुसऱ्यांदा केल्याचे सिद्ध झाल्यास ती शिक्षा सात वर्षे होऊ शकते. पूनमचे असे कित्येक अश्लील व्हिडीओ प्रसारित झाले आहेत.

गोव्यात केले होते लग्न
गेल्या वर्षी लॉकडाऊन चालू असताना पूनम पांडेने आपला अनेक वर्षांचा प्रियकर असलेल्या सॅम बॉम्बे याच्याशी लग्न केले आणि हनिमूनसाठी ते दोघे गोव्यात आले होते. पाळोळे-काणकोण येथे एका हॉटेलमध्ये ते उतरले असता, त्या दोघांत कडाक्याचे भांडण होऊन हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले होते. पूनमने आपल्याच पतीविरुद्ध आपला विनयभंग केल्याची आणि मारहाण केल्याची तक्रार केल्यानंतर सॅमला अटकही करण्यात आली होती. हे प्रकरणही काणकोण पोलिसांत पडून आहे.

संबंधित बातम्या