Madgaon Mayor : घनःश्याम शिरोडकर यांच्यावर अग्निपरीक्षेची वेळ

72 तासांतच अविश्वास; 5 नगरसेवकांचे नगरपालिका संचालक कार्यालयाला पत्र
 Ghanshyam Shirodkar
Ghanshyam ShirodkarDainik Gomantak

Madgaon Mayor : मडगावचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष घनःश्याम शिरोडकर यांच्या विरोधात आज अपेक्षेप्रमाणे अविश्‍वास ठराव प्रस्ताव दाखल करण्यात आला. निवड झाल्यानंतर अवघ्या 72 तासांतच त्यांच्यावर विश्‍वास सिद्ध करण्याची वेळ आली आहे. पाच नगरसेवकांनी पालिका संचालक कार्यालयात ठरावाचे पत्र दिले. मात्र, हा अविश्‍वास नेमक्या कोणत्या कारणासाठी आणला, याचा पत्रात कोणताही उल्लेख केलेला नाही.

शुक्रवारी घनःश्याम शिरोडकर यांनी भाजप गटाचे दामोदर शिरोडकर यांना 15-10 मतांनी पराभूत केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मॉडेल मडगाव आणि भाजपच्या सर्व नगरसेवकांना बोलावत त्यांच्या अविश्‍वास ठरावावर सह्या घेतल्या होत्या. यानंतर आज उपनगराध्यक्ष दीपाली सावळ, महेश आमोणकर, कामिल बार्रेटो, श्‍वेता लोटलीकर आणि सगुण नायक यांनी नगराध्यक्षांविरोधात ठराव दाखल केला. ‘हा ठराव दाखल करावा असा आदेश आम्हाला भाजप नेत्यांनी दिला आहे. त्याचे आम्ही पालन करत आहोत,’ अशी प्रतिक्रिया बार्रेटो यांनी दिली.

तीन मतांची आवश्‍यकता

निवडणूक गुप्त मतदानाद्वारे झाल्यामुळे भाजपच्या 5 नगरसेवकांनी क्रॉस व्होटिंग केले. मात्र, आता अविश्‍वास ठरावावर हात दाखवून मतदान होणार आहे. त्यामुळे दिगंबर कामत गट आणि भाजपच्या किमान तीन नगरसेवकांनी घनःश्याम यांच्या बाजूने उघडपणे मतदान केल्यासच त्यांचे पद कायम राहिल. ‘अजून आपल्याकडे ठरावाची नोटीस आलेली नाही. ती जेव्हा येणार त्यावेळी काय करायचे ते पाहून घेऊ,’ अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षांनी दिली.

यापूर्वी कधीही असे घडले नाही

या ठरावाबद्दल माजी नगराध्यक्ष सावियो कुतीन्हो यांनी टीका केली आहे. अविश्‍वास ठरावात घनःश्‍याम जिंकून आले तर त्यांच्याविरोधात पुन्हा ठराव आणणार का? असा संतप्त सवाल त्यांनी भाजपला केला. कशाही पद्धतीने का असेना पण 15 नगरसेवकांनी त्यांना मते देऊन निवडून आणले. त्यामुळे त्यांना काम करू द्यावे. नगरसेवकांना देवासमोर नारळावर हात ठेऊन शपथ घ्यायला लावणे हे पूर्ण चुकीचे आहे. मडगाव पालिकेच्या कारभारात असे यापूर्वी कधीही झाले नव्हते, असे ते म्हणाले.

 Ghanshyam Shirodkar
Goa Drugs : ड्रग्ज दलालांच्या शोधार्थ हैदराबाद पोलिस गोव्यात

दुसरीकडे मांद्रेचे सरपंच महेश कोनाडकर यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी अविश्‍वास ठराव मंजूर झाला होता. त्यानंतर उपसरपंच चेतना पेडणेकर यांच्या विरोधातही अविश्‍वास ठराव आणून तोही मंजूर केला गेला. एकूण 11 पंच सदस्य असलेल्या पंचायत मंडळातून ठरावावर चर्चा करताना उपसरपंच चेतना पेडणेकर, महेश कोनाडकर, राजेश मांजरेकर आणि संपदा आसगावकर या चार पंच सदस्य गैरहजर राहिल्याने सात विरुद्ध चार असा ठराव मंजूर झाला. सरपंच अमित सावंत यांच्या नेतृत्वाखाली विशेष बैठक पंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com