कोरोनाच्या संकट काळात टीका नको

Prashant Shetye
शनिवार, 11 जुलै 2020

मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेले दिगंबर कामत हे राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते असून कोरोनाच्या संकट काळात समस्या व त्रुटी असल्यास सरकारला सूचना करून सरकारच्या निदर्शनास त्यांनी आणून द्याव्यात. केवळ टीका करून या विषयाचे राजकारण करू नये, असे मत उपमुख्यमंत्री बाबू आजगावक यांनी येथे व्यक्त केले.

मडगाव
कामत हे विरोधी पक्षनेतेपद सांभाळत असल्याने काँग्रेस पक्ष त्यांच्यावर सरकार व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधात टीका करण्यास सांगत आहे. कामत यांच्या सूचना यापूर्वी सरकारने मान्य केल्या आहेत. कोरोनाच्या संकट काळात त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून सरकार सूचनांची अपेक्षा बाळगते, टीकेची नव्हे, असे आजगावकर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी भाजपचे राज्य सरचिटणीस दामू नाईक व भाजपच्या मडगाव मंडळाचे अध्यक्ष रुपेश महात्मे उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे कार्यक्षम नेते असून सर्वांना सोबत घेऊन ते कोरोनाच्या संकटाचा मुकाबला समर्थपणे करत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही दहावीची परीक्षा यशस्वीपणे त्यांनी घेऊन दाखवली. टाळेबंदी काळातही त्यांनी स्थिती योग्य पद्धतीने हाताळली आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता वाढत असली तरी सावंत व राणे इतर नेत्यांना व गोमंतकीय जनतेला सोबत घेऊन कोरोनाच्या संकटाला यशस्वीपणे टक्कर देतील, असा विश्वास आजगावकर यांनी व्यक्त केला.
गोव्याचीच नव्हे, तर देशाची व संपूर्ण जगाचीच अर्थव्यवस्था बिघडलेली आहे, पण मुख्यमंत्री डॉ. सावंत गोवा राज्याची, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नाने अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कामत यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या व मंत्रिपदाच्या कारकीर्दीत जायका तसेच खाण प्रकरणे कशा पद्धतीने घडली ते गोमंतकीयांना ठाऊक आहे. ते भाजपमध्ये असताना माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांना मंत्री म्हणून पुढे आणले. पर्रीकर यांनी त्यांना पुन्हा मंत्री केले होते. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपदही सांभाळले आहे. ते अनुभवी नेते असून त्यांनी सरकारला सूचना करून कामे करून घ्यावीत. सरकारवर व मुख्यमंत्र्यांवर त्यांनी वृथा टीका करू नये. सर्व मंत्री व भाजपचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असून मुख्यमंत्र्यांवर विनाकारण होत असलेली टीका खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

संपादन - यशवंत पाटील

 

संबंधित बातम्या