Goa Politics: युतीच्या वाटेत नकारांचे काटे

goa assembly image.jpg
goa assembly image.jpg

पणजी: विधानसभेची आगामी निवडणूक (Goa Assembly Election) ही आघाडी करून लढवण्याची तयारी अनेक पक्षांनी केली असली तरी या युतीच्या वाटेत नकारांचे काटे खूप आहेत. कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिल्लीत वरिष्ठ आघाडीविषयी निर्णय घेतले जातील, असे सांगून स्थानिक पातळीवरील (गोवा फॉरवर्ड आदी) तडजोडीचा मार्ग बंद केला. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (MGP) राष्ट्रीय पक्षाशी युती करण्यास इच्छुक नाही, असे सांगत भाजपसोबतची (BJP) परंपरागत युती होऊ शकणार नाही, असे संकेत दिले आहेत. काँग्रेस (Congress) आपल्याच विश्वात मश्गुल, मगोचे काही ठरेना, गोवा फॉरवर्ड आक्रमक अशी स्थिती सध्या पक्षाची आहे. (No decision has been taken to form an alliance of the Congress MGP gomantak and GFP in view of the Assembly elections)

भाजपविरोधी सर्व पक्ष एकत्र यावेत असे मध्यंतरी प्रयत्न सुरू होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आम आदमी पक्ष सोडून इतर पक्षांशी आघाडी करण्यास पक्षाचे दरवाजे उघडे आहेत असे स्पष्ट केले होते. त्यावेळी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले 10 आमदार भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढवणे ही  मतदारांची मानसिकता पाहता थोडे कठीण जाणार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जातील अशी चर्चा होती. कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी चोडणकर असेपर्यंत गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई त्यांच्याशी आघाडीची चर्चा करणार नाहीत हे जणू ठरून गेलेले आहे. त्यातच अधूनमधून स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करून चोडणकर कार्यकर्त्यांत उत्साह आणतात खरे पण त्यातून आघाडीची बिघाडी करण्याचे वातावरण तयार होते याकडे ते लक्षही देत नाहीत. गोवा फॉरवर्डने आघाडीचा निर्णय काय तो लवकर घ्या असे सांगणे सुरु केले आहे. 

उत्सुकता शिगेला

भाजपच्या बैठकीत युतीची चर्चा झाली असली तरी मधल्या फळीतील नेत्यांच्या बैठकीत मुद्दामहून स्वबळावर लढण्याची तयारी करा असा आदेश मुद्दामहून दिला आहे. मगोची व भाजपच्या मतांची फाटाफूट झाली तर त्याचा फायदा विरोधकाना होईल याचा अंदाज भाजपला आला आहे. मात्र मगोने चर्चेआधीच युतीचे दरवाजे राष्ट्रीय पक्षांसाठी बंद केले आहेत. त्यामुळे गोवा फॉरवर्ड, मगो यांच्यासह कोणता प्रादेशिक पक्ष या आघाडीत असेल याविषयी उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रीय पक्ष नको असे सांगून उत्तरेत मगो तर दक्षिणेत गोवा फॉरवर्ड असे राजकीय चित्र तयार करण्याचा हा प्रयत्न असू शकतो.

कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने पक्षाचे निर्णय पक्ष श्रेष्ठी दिल्लीत घेतात. असा निर्णय दिल्लीत नेहमीच घेतला जात असल्याने आताही त्याला अपवाद असू शकत नाही. पक्षश्रेष्ठी निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांच्या भावनांची जरूर दखल घेतील अशी आमची अपेक्षा असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले आहे.

‘टीम गोवा’ची संकल्पना मडगाव पालिकेत राबवून ती आम्ही यशस्वी करुन दाखविली आहे. ती आम्हाला संपूर्ण गोव्यासाठी राबवायची आहे. काँग्रेसबरोबर युतीसाठी आम्ही काही वेळापर्यंत वाट पाहू. त्याअवधीत ते पुढे न आल्यास भाजपा सोडून इतर पक्षांबरोबर युतीचे पर्याय आपल्यकडे आहे असे मत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मांडले आहे. 

मगोपबरोबर युती करण्याचा प्रस्ताव नाही आणि आपले पक्षश्रेष्ठीही  त्याबाबत सध्या अनुकूल नाहीत असे भाजपा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले. तर, केवळ राज्यातीलच नव्हे तर इतर राज्यांतील प्रादेशिक पक्षांशी युती होऊ शकते असे मला म्हणायचे आहे. राज्यात तोडफोडीच्या राजकारणाला बळ देणाऱ्या राष्ट्रीय पक्षांशी (कॉंग्रेस व भाजप) युती नको असा सरळ विचार मी मांडला असल्याचे मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सांगितले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com