उपचारासाठी वास्कोवासियांबाबत भेदभाव नको 

विलास महाडिक
मंगळवार, 21 जुलै 2020

काही दिवसांपूर्वी वास्कोतील एक रुग्ण गोमेकॉत शस्त्रक्रियेसाठी दाखल होता. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी रक्ताच्या सहा बाटल्या उपलब्ध करा असे त्याला सांगण्यात आले. रक्त दिलेल्यांची कार्डे घेतली जाणार नाही. माणसांना रक्त देण्यासाठी घेऊन या असे सांगण्यात आले होते. हे इस्पितळ लोकांच्या कराच्या रक्कमेतून बांधण्यात येत असल्याने सर्वांना सारखीच वागणूक मिळायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले. 

पणजी

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ हे राज्यातील सर्व लोकांना उपचारासाठी आहे, असे असताना या इस्पितळातील डॉक्टर्स तसेच कर्मचाऱ्यांकडून वास्कोतील लोकांवर उपचार न करताच अपमानित केले जात आहे. सरकारने हा प्रकार त्वरित थांबवावा व सर्व भागातील लोकांना समान वागणूक देण्याची मागणी करत गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या शिष्टमंडळाने गोमेकॉच्या डीन कार्यालयावर मोर्चा नेत निवेदन त्यांच्या स्वीय सचिवांकडे दिले.  
काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सकाळी गोमेकॉचे डीन, वैद्यकीय अधीक्षक व संचालक या सर्वांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही उपलब्ध होऊ शकले नाही. त्यांच्या अनुपलब्धतेबाबत संताप व्यक्त करून आमोणकर म्हणाले की, वास्कोतील रुग्णांना गोमेकॉ इस्पितळातील कर्मचाऱ्यांना ‘गेट आऊट’ करून अपमानित केले जात आहे. असे प्रकार अनेक रुग्णांच्या बाबतीत घडले आहेत. हे रुग्ण गरीब व आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेले असल्याने ते त्याविरुद्ध आवाज उठवित नाहीत. वास्कोतील लोकांना वारंवार अपमानित केले जाते असा आरोप त्यांनी केला. इस्पितळात रुग्णांवर उपचार व सेवा देण्याची पद्धत ठरविली गेलेली नसल्याने असे प्रकार घडून वास्कोवासियांना अपमानित होण्याची पाळी येत आहे असे ते म्हणाले.  
काही दिवसांपूर्वी वास्कोतील एक रुग्ण गोमेकॉत शस्त्रक्रियेसाठी दाखल होता. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी रक्ताच्या सहा बाटल्या उपलब्ध करा असे त्याला सांगण्यात आले. रक्त दिलेल्यांची कार्डे घेतली जाणार नाही. माणसांना रक्त देण्यासाठी घेऊन या असे सांगण्यात आले होते. हे इस्पितळ लोकांच्या कराच्या रक्कमेतून बांधण्यात येत असल्याने सर्वांना सारखीच वागणूक मिळायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले. 
त्यामुळे वास्कोतील सहा तरुणांना घेऊन इस्पितळात आलो असता हे तरुण वास्कोतील आहेत म्हणून रक्त घेण्यात आले नाही. वास्को व्यतिरिक्त इतर कोणत्याही भागातील व्यक्ती चालतील असे डॉक्टरांनी सांगितले. वास्को परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सरकारच जबाबदार आहे. ज्वेहा तेथील लोकांनी टाळेबंदीची मागणी केली तेव्हा सरकारने ती केली नाही व जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा ही टाळेबंदी करून मुरगावात ती आणखी चार दिवस वाढविण्यात आली आहे. रुग्णांना सेवा देताना तसेच उपचार करताना इस्पितळातील कर्मचाऱ्यांना कोणताही भेदभाव न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी कराव्यात अशी मागणी आमोणकर यांनी केली. 
वास्को येथे रेल्वे सेवा सुरू आहे तसेच दाबोळी विमानतळावर विमाने येत आहेत. त्यामुळे पर्यटक गोव्यात येत आहेत त्यांना टाळेबंदी
नाही मात्र वास्कोवासियांना टाळेबंदी करून अन्याय केला जात आहे. वास्कोत कोरोनाचा फैलाव होण्याला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. स्थानिकांनी टाळेबंदीची तसेच सर्वांची कोविड चाचणी करण्याची मागणी केली होती पूर्ण केली असता हा प्रसार इतक्या प्रमाणात वाढला नसता असे आमोणकर म्हणाले.  
 

संबंधित बातम्या