पणजी महापालिकेकडून अद्याप बायंगिणी कचरा प्रकल्पाची ई-निविदा नाही!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

महापालिकेचा ओला कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या कळंगुट व साळगावच्या लोकांनी अडविल्या तेव्हा बायंगिणी कचरा प्रकल्पाची गरज असल्याचे स्पष्ट झाले. 

पणजी: बायंगिणी कचरा प्रकल्पाची निविदा दहा दिवसांत काढली जाईल, असे आश्वासन स्वतः मुख्यमंत्र्यांनी देऊन १५ दिवस होऊनही ती निघाली नाही. दरम्यान, ई निविदा पूर्वीची कागदोपत्री प्रक्रिया कचरा व्यवस्थापन महामंडळाने सुरु केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

उत्तर गोव्यातील साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पानंतर महत्त्वाचा ठरणारा बायंगिणी कचरा प्रकल्प लवकरात लवकर उभारणे अत्यंत गरजेचा आहे. पणजी महापालिकेने  कचरा प्रकल्पासाठी राज्य सरकारला १ लाख ७१ हजार चौ. मी. जागा दिली होती. या प्रकल्पा पूर्वी साळगावचा कचरा प्रकल्प उभारला गेला. महापालिकेचा ओला कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या कळंगुट व साळगावच्या लोकांनी अडविल्या तेव्हा बायंगिणी कचरा प्रकल्पाची गरज असल्याचे स्पष्ट झाले. 

या प्रकल्पाला विरोध झालातरी उच्च न्यायलयाने अटी व शर्ती टाकत प्रकल्प उभारणीस परवानगी दिली. ऑगस्ट महिन्यात २८ रोजी कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो, आमदार बाबूश मोन्सेरात, कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लेविन्सन मार्टिन्स मंत्रालयात भेटले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दहा दिवसांत बायंगिणी कचरा प्रकल्पाची ई निविदा काढली जाईल, असे आश्वासन दिले होते.

आता मुख्यमंत्र्यांच्या दिलेल्या आश्वासनानंतर मंत्री  मायकल लोबो यांनी मागील ७ सप्टेंबरला लवकरच प्रकल्पाविषयीची फाईल महापालिका आणि आमदार मोन्सेरात यांना दाखविली जाईल. मगच निविदा निघेल हे निश्चित होते. त्यानंतर एक आठवडा झाला तरी ती फाईल महापालिकेत आली नाही.

दरम्यान, कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मार्टिन्स यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले की, बायंगिणी कचरा प्रकल्पाच्या ई - निविदा काढण्यापूर्वीच्या इतर परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या