डिचोली बाजारात वाहनांना ‘नो एन्ट्री’

प्रतिनिधी
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

अंमलबजावणी सुरू, चतुर्थी बाजारातील ताण कमी करण्यासाठी पालिकेचा निर्णय

डिचोली: चतुर्थी काळात डिचोली बाजारातील गर्दीवरील ताण कमी करण्यासाठी तीन दिवस बाजारात वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून, आजपासून (बुधवार) या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. डिचोली वाहतूक पोलिस आणि नगरपालिका यांची एक संयुक्‍त बैठक होऊन चतुर्थीनिमित्त तात्पुरता वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार कोणत्याही प्रकारच्या वाहनांना शुक्रवारपर्यंत बाजारात प्रवेश करायला बंदी घालण्यात आली आहे. 

चतुर्थीच्या आधी दोन-तीन दिवस बाजारात विविध सामानांची फेरी भरत असल्याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उसळत असते. त्यातच बेशिस्तपणे बाजारात दुचाकी आदी वाहने नेण्याचे प्रकार घडत असल्याने बाजारात मोठी समस्या निर्माण होत असते. या समस्येची दखल घेवून वाहनांना बाजारात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा कोरोना महामारीमुळे बाजारातील व्यवहारांवर मर्यादा आल्या असून, माटोळीचा बाजारही बाजाराबाहेर नेण्यात आला आहे. तरीदेखील अन्य साहित्य खरेदीसाठी गणेशभक्‍तांची बाजारात वर्दळ अपेक्षित आहे. वाहनांचीही वर्दळ वाढण्याची शक्‍यता गृहीत धरुन बाजारात वाहनांना बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षीही चतुर्थीवेळी अशीच व्यवस्था करताना दोन दिवस वाहनांना बाजारात बंदी घालण्यात आली होती. 

वाहनांची गर्दी..!
बाजारात वाहनांना प्रवेश बंद करण्यात आल्याने आज बाजाराबाहेर वाहने पार्क करण्याची पाळी वाहनचालकांवर आली. काहींनी तर मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करून ठेवली होती. काहीजण तर बेशिस्तपणे वाहने पार्क करीत होते. त्यामुळे गोंधळ निर्माण होताना दिसून येत होता. बसस्थानकाकडून बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर  तर दुचाकी आदी वाहनांची गर्दी दिसून येत होती. शहरातील अन्य काही ठिकाणीही अशीच स्थिती होती. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. गोंधळ टाळून वाहतूक व्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी अधिसूचित केलेल्या जागेत वाहनधारकांनी शिस्तीने वाहने पार्क करावीत, असे आवाहन नगराध्यक्ष सतिश गावकर यांनी केले आहे.

विविध ठिकाणी बॅरेकटस्‌..!
शहरातील प्रथमश्रेणी न्यायालय, पालिका इमारतीच्या मागे, व्होडली जंक्‍शन, शिल्पा बार, एचडीएफसी बॅंक, कॅनरा र्बॅंकेजवळील एसी बारजवळ मिळून बाजारात जाणारे सर्व मार्ग अडवण्यात आले आहेत. दुचाकी वा अन्य कोणत्याही वाहनांना आत-बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार विविध मार्गावर बॅरेकेटस्‌ उभारण्यात आले असून, वाहतूक पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. चतुर्थी बाजार काळात चारचाकी आणि दुचाकी वाहनांना विविध ठिकाणी पार्किंग करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती नगराध्यक्ष सतिश गावकर यांनी दिली. 

संबंधित बातम्या