‘मोप’वर कोविडचा प्रभाव नाही

Dainik Gomantak
गुरुवार, 2 जुलै 2020

आंतरराष्‍ट्रीय हरित विमानतळ मार्च २०२२ पर्यंत पूर्णत्त्‍वास

पणजी

मोप येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय हरित विमानतळाचे काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होईल. त्या प्रकल्पाचे काम ‘कोविड’ टाळेबंदीमुळे मागे पडलेले नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळात आज या प्रकल्पाविषयी अनेक निर्णय घेण्यात आले. त्याविषयी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, मोप येथील विमानतळाचे काम वेगाने सुरू आहे. टाळेबंदीमुळे हे काम मागे पडलेले नाही. कोविडची छाया हटली की, पत्रकारांना नेऊन विमानतळाचे काम दाखवण्याचा मानस आहे. मोप येथील विमानतळ ठरल्यानुसारच पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी २ हजार ३६७ चौरस मीटर अतिरिक्त जमीन संपादित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या विमानतळाची धावपट्टी आता ३ हजार ७५० मीटरऐवजी ३ हजार ५०० मीटरची असेल. मात्र, याचा परिणाम विमानतळाच्या क्षमतेवर होणार नाही.
मडगाव वास्को लोहमार्ग दुपदरी करण्यासाठी १ हजार २३५ चौरस मीटर जमीन जमीन मालकांची संमती घेऊन संपादित केली आहे. त्याला मान्यता देण्यात आली. मडकई येथे गेल कंपनीसाठी जागा संपादित करण्यास संमती देण्यात आली आहे. आरोग्य सेवा संचालनालयाने ‘कोविड’ महामारीचा सामना करण्यासाठी केलेल्या ५ कोटी रुपयांच्या खरेदीस आणि ३० परिचारिकांच्या कंत्राटी पद्धतीच्या नियुक्तीस कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने ‘कोविड’ महामारीचा सामना करण्यासाठी केलेल्या ३ कोटी रुपयांच्या खरेदीस कार्योत्तर मंजुरी देण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.

नोकरभरतीस पाच ऐवजी सात वर्षे मुदतवाढ
पाच वर्षाऐवजी सात वर्षे नोकरभरती न केल्यास ते पद आता रद्द होणार नाही. त्यासंदर्भातील नियमांत दुरुस्तीस मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. ते पद भरण्यासाठी गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाकडून मनुष्यबळ घेण्यास खातेप्रमुखाला अधिकार दिले आहेत. याला पुन्हा कार्मिक खात्याची मान्यता लागणार नाही. २७ जुलैपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन बोलावण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे. गोवा राज्य सौर धोरणाच्या दुरुस्तीस मान्यता देण्यात आली आहे. साळ नदीच्या तोंडावर कुटबण येथील गाळ काढण्याच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. दवर्ली येथे वीज उपकेंद्र उभारण्यासाठी जलसंपदा खात्याची जमीन वीज खात्याला हस्तांतरीत करण्यासही मान्यता देण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

व्‍यवसाय सुलभतेसाठी नवा सल्लागार
सायंटिफिक असिस्टंट पदासाठी गोवा लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवाराला नियुक्ती न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवाराला कोकणीचे ज्ञान नसल्याने हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोमेकॉत पल्मनरी सायन्स विभागात कंत्राटी पद्धतीने व्याख्याता नेमण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती देऊन ते म्हणाले, व्यवसाय सुलभतेसाठी सल्लागार बदलण्यात आला आहे. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे काम सुरळीत करण्यासाठी असे केले आहे. पणजीत ३० ठिकाणी कचरा व्यवस्थापन करण्यास केंद्र सरकारने निधी दिला आहे. ते प्रकल्प चालवण्यास व देखभाल दुरुस्तीसाठी राज्य सरकार निधी देणार आहे. त्याशिवाय साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासही मंजुरी देण्यास आली.

जगभरातील डॉक्टर कोविड रुग्णांची सेवा करत आहेत. मी त्यांचे डॉक्टर दिनानिमित्त त्यांचे अभिनंदन करतो. गोव्यातही ‘कोविड’ रुग्णांची सेवा करताना काही डॉक्टर व पारिचारिकांना ‘कोविड’ची लागण झाली. त्यांची उपचाराची व्यवस्था केली आहे. आज सनदी लेखापाल दिनही आहे, त्यांनाही शुभेच्छा.
-डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

संबंधित बातम्या