कोरोनामुळे फुलांच्या मागणीत घाट झाल्याने फूल विक्रेत्यांचे स्थलांतर टळले

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

कोरोनाचे संसर्गामुळे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने मार्केटमध्ये यापूर्वी गणेशोत्सवाच्या काळात फुलांच्या खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन येथील फूल विक्रेत्यांना मार्केटबाहेर नेण्याचा निर्णय घेतला होता.

पणजी: गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गतवर्षीपेक्षा ७५ टक्के व्यवसायावर परिणाम झाला आहे. २५ टक्के लोक खरेदीसाठी येत असल्याने विक्रेत्यांचे मार्केटबाहेर फूल खरेदीसाठी जाण्याचे टळले. फूल विक्रेत्यांना बसण्यासाठी महापौरांनी मंडप घालून त्यांची सोय केली होती, परंतु ग्राहकांची संख्या कमी असल्याने तो मंडपही काढण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात ५० रुपयांचा हार २०० ते अडीचशे रुपयांना विकला जात होता, पण यावर्षी मात्र विक्रेत्यांकडे मागणी कमी असल्याने हारांचे दरही पडलेले दिसून आले. 

कोरोनाचे संसर्गामुळे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने मार्केटमध्ये यापूर्वी गणेशोत्सवाच्या काळात फुलांच्या खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन येथील फूल विक्रेत्यांना मार्केटबाहेर नेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर विक्रेत्यांनी त्यास विरोध केला होता. गणेशोत्सवाला काही तास उरले असतानाही फूल विक्रेत्यांच्या दुकानांवर गर्दी दिसून आली नाही. गर्दीच नसल्याने विक्रेत्यांना फुलांच्या हाराची किंमतही नेहमीप्रमाणे ठेवावी लागली आहे. यापूर्वी गणेशोत्सव असो की कोणताही सण असो त्यावेळी फुलांच्या हाराचे दर चौपट होतात. शिवाय फूल विक्रेत्यांच्या दुकानांसमोर गर्दी असते. कोरोनामुळे ही गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने या विक्रेत्यांना मार्केटबाहेर नेण्याचा निर्णय घेतला होता. गणेशोत्सवामुळे फूल खरेदीसाठी लोकांची गर्दी होईल अशी शक्यता होती, परंतु म्हणावी तेवढी गर्दी फूल खरेदीसाठी झाली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

मार्केटबाहेर बसण्याची सोय केली असून त्याठिकाणी बसावे म्हणून महापालिकेने फूल विक्रेत्यांना विनंती केली होती. परंतु मार्केटमधील व्यापारी संघटनेतील काही सदस्यांनी कांग्रेसच्या नेत्यांना आणून त्यात राजकारण घुसविल्याचा प्रकारही घडला होता. मार्केटबाहेर विक्रेत्यांसाठी जो मंडप घातला होता, त्या मंडपाचे भाडे महापौरांनी दिले होते. परंतु विक्रेत्यांनी बसण्यास नकार दिल्याने मंडपमालकाने तो मंडप आज सकाळी हटविला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या