वास्कोत टाळेबंदीची गरज नाही

Dainik Gomantak
शुक्रवार, 5 जून 2020

मुख्यमंत्री ः नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक

मुरगाव

वास्कोत मांगोरहिल वगळता इतरत्र कोरोनाचे रुग्ण सापडलेले नाहीत. त्यामुळे वास्कोत टाळेबंदी लागू करण्याची गरज नाही. मात्र, वास्कोतील जनतेने घराबाहेर पडल्यानंतर अतिदक्षता घेणे, सर्व सूचनांचे पालन करणे हे अत्यावश्यकच आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज रात्री सांगितले.
वास्कोत भेट देऊन आल्यावर ते म्हणाले, वास्कोच्या लोकप्रतिनिधींशी मी चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर वास्कोतील मांगोरहिल वगळता इतर ठिकाणी कोरोनाचा फैलाव झाला नसल्याचे दिसून आले आहे. इतर ठिकाणच्याही काही जणांच्या चाचण्या त्यांचा संपर्क त्या कुटुंबाशी आल्यावरून केल्या, पण त्यातून त्यांना कोरानाची बाधा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.
राज्याच्या सीमा खुल्या केलेल्या नाहीत. राज्याच्या हद्दीत पाय ठेवताच कोरोनाची चाचणी केली जात आहे म्‍हणूनच रुग्ण सापडत आहेत. कळंगुट येथील महिलेचीही चाचणी केली होती. त्यामुळे तिला कोरोनाची लागण झाल्‍याचे दिसून आले. मांगोरहिलमध्येही कोरोना विषाणू बाहेरून आला, त्याशिवाय इतर रुग्ण हे राज्याबाहेरून आलेले आहेत. त्यामुळे गोव्याच्या समाजात कोरोनाचा प्रसार झाला असे म्हणता येणार नाही.
मांगोरहिलमध्ये टाळेबंदी आहे, मांगोरहिल हा परिसर मुरगाव पालिकेच्या ११ व १७ क्रमांकाच्या दोन प्रभागांनी मिळून बनलेला आहे. तेथून कोणाला बाहेर जाऊ दिले जात नाही की तेथे कोणी जाऊ शकत नाही. ही परिस्थिती आणखीन १०-१२ दिवस राहणार आहे. मांगोरहिल येथे परराज्यातून आलेल्या चालकाकडून कोरोना विषाणू पोचल्याचे सध्या दिसते. मात्र, राज्यात येणाऱ्या प्रत्येक चालकाची तपासणी करता येणे शक्य नाही. चाचणीचा निकाल येईपर्यंत वाहन थांबवून ठेवता येत नाही. कारण ते जीवनावश्यक वस्तू घेऊन येत नसतात, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वास्कोत येताच सर्वप्रथम दामोदर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांनी मांगोरहिल परिसराला भेट देऊन तेथील एकूण स्थितीची माहिती डॉक्टर, पोलिस यांच्याकडून करून घेतली.

संबंधित बातम्या