
फोंडा : ‘सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही,’ असे जे म्हटले जाते त्याचा प्रत्यय हल्ली सगळीकडेच यायला लागला आहे. पंचायती-नगरपालिका या ‘लोकल बॉडी’ असल्यामुळे तिथे ही उक्ती जास्तच अधोरेखित होताना दिसायला लागली आहे. आता कुर्टी-खांडेपार पंचायतही त्याच वळणावर जायला लागली आहे.
गेल्यावेळी ही पंचायत गाजली होती ती ‘संगीत खुर्ची’च्या खेळामुळे. फोंडा मतदारसंघातील कुर्टी-खांडेपार पंचायतही भाजपच्या गळाला लागल्यामुळे भाजपने हा मतदारसंघ शंभर टक्के जिंकला असेच म्हणावे लागेल. आता गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे पाच समर्थक पंच, मगोचे म्हणण्यापेक्षा डॉ. केतन भाटीकरांचे चार समर्थक पंच, काँग्रेसचा एक तर एक अपक्ष असे अकरा पंच निवडून आले होते.
भाटीकरांचे चार, काँग्रेस आणि अपक्ष अशा सहा पंचांनी एकत्र येऊन पंचायत स्थापन केली होती. नावेद तहसीलदार हे सरपंच तर काँग्रेसच्या विल्मा परेरा या उपसरपंच बनल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भाजपला दूर ठेवण्यात यश मिळवले होते. अर्थात हे समीकरण जास्त दिवस टिकणे शक्य नाही, असा होरा राजकीय तज्ज्ञांनी त्यावेळी व्यक्त केला होता. आणि तो होरा आता तंतोतंत खरा ठरला आहे.
पक्षांमध्ये सेटिंग?
भाजपचा सरपंच व काँग्रेसचा उपसरपंच असे समीकरण जुळल्यामुळे हे भाजप काँग्रेसचे सेटिंग तर नव्हे, असे वाटणे साहजिकच आहे. विद्यमान उपसरपंच विल्मा परेरा यांना याबाबत विचारल्यावर त्यांनी पंचायतीच्या विकासाकरता पाठिंबा दिल्याचे सांगितले. फोंड्याचे आमदार तथा कृषी मंत्री रवी नाईक हे भाजपचे असल्यामुळे पंचायतीच्या विकासाकरता भाजप पॅनलला पाठिंबा दिल्याचे त्या म्हणाल्या.
भाटीकरांचे पंच ‘इंटॅक्ट’
डॉ. केतन भाटीकरांचे चार समर्थक पंच निवडून आले होते ते आता विरोधी गटात असून अजून तरी ते एकसंघ वाटत आहेत. त्यामुळे पंचायतीतली भाटीकरांची शक्ती घटलेली दिसत नाही. आता ही शक्ती किती दिवस इंटॅक्ट राहते, हे बघावे लागेल. पण सध्या तरी हे चार पंच भाटीकरांबरोबर आहेत, असेच चित्र दिसते आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.