राज्याच्या सीमा खुल्या पण स्थानिक प्रवासी वाहतूक अद्यापही बंदच

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

मागील १ सप्टेंबर रोजी राज्यातील सीमा खुल्या झाल्यानंतर राज्याबाहेरून वाहतूक सेवा सुरू झाली असली, तरी अद्यापही स्थानिक प्रवासी वाहतूक व्यवस्था जाग्यावर आलेली नाही. 

डिचोली: कोरोना महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत बऱ्याच अंशी शिथिलता आली असली, तरी डिचोलीत अद्यापही बहुतेक खासगी प्रवासी बसगाड्या बंदावस्थेत आहेत. मागील १ सप्टेंबर रोजी राज्यातील सीमा खुल्या झाल्यानंतर राज्याबाहेरून वाहतूक सेवा सुरू झाली असली, तरी अद्यापही स्थानिक प्रवासी वाहतूक व्यवस्था जाग्यावर आलेली नाही. 

डिचोलीतील विविध ग्रामीण भागातून धावणाऱ्या बहुतेक खाजगी प्रवासी बसगाड्या तर अद्यापही नियोजित मार्गावर उतरल्या नसल्याने ग्रामीण भागातील प्रवासी वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. परिणामी नोकरीधंदा आदी कामानिमित्त शहरी भागात जाणाऱ्या ग्रामीण भागातील प्रवासीवर्गाला अजूनही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दुसऱ्या बाजूने सध्याच्या स्थितीत बसगाड्या रस्त्यावर उतरविणे परवडत नसल्याचे खासगी बसमालकांचे म्हणणे आहे. बसगाड्या रस्त्यावर उतरविल्या तरी प्रवासी मिळत नसल्याने आर्थिक संकटात आल्याची खंत खासगी प्रवासी बसवाले व्यक्‍त करीत आहेत. 

कोरोनाचे संकट टाळण्यासाठी मागील मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टाळेबंदी लागू केल्यानंतर प्रवासी वाहतूक सेवाही बंद करण्यात आली. सरकारी कर्मचाऱ्यांची व्यवस्था म्हणून काही दिवसांनी कदंब वाहतूक महामंडळाच्या बसगाड्या रस्त्यावर उतरविल्या. मात्र, सुरवातीचे बरेच दिवस खासगी प्रवासी बसगाड्या बंदच होत्या. कालांतराने खाजगी प्रवासी बसगाड्यांना वाहतूक करण्यास मुभा देण्यात आली. मात्र, वाहतूक करताना बसगाड्यांमधून सामाजिक अंतर पाळण्याची सक्‍ती करण्यात आली. प्रवासी बसगाड्या बरेच दिवस बंद राहिल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या काही बसमालकांनी आपल्या बसगाड्या नियोजित मार्गावर उतरविल्या. मात्र, कोरोनाचा धोका यामुळे खासगी बसगाड्यांतून काही प्रवासी बिनधास्तपणे प्रवास करण्याचे धाडस करीत नाहीत. प्रवासी मिळत नसल्याने काही दिवसांनी काही खासगी प्रवासी बसगाड्यांची वाहतूक सेवा बंद झाली. तर ग्रामीण भागातून धावणाऱ्या काही प्रवासी बसगाड्या मागील मार्च महिन्यापासून अद्यापही रस्त्यावर उतरलेल्या नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. 

मोजक्‍याच प्रवासी बसगाड्यांची वाहतूक
सध्याच्या घडीस वाळपई-म्हापसा ते पणजीपर्यंत तसेच फोंड्याहून डिचोलीपर्यंत अशा लांब पल्ल्याच्या मार्गावर वाहतूक करणाऱ्या मोजक्‍याच खासगी बसगाड्या वाहतूक करताना आढळून येत आहे.  डिचोली बसस्थानकावरही ठराविक वेळेतच खासगी प्रवासी बसगाड्या येत असल्याचे सध्या दिसून येत आहे. म्हावळिंगे, पिळगाव आदी काही मोजक्‍याच ग्रामीण भागातून सोडल्यास अन्य प्रवासी बसगाड्या नियोजित मार्गावर धावताना दिसून येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी वर्गाचे अक्षरक्ष: हाल होताना दिसून येत आहे. प्रवाशांना कदंबच्या बसगाड्यांवर अवलंबून आणि तिष्ठत राहावे लागते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या