निधीअभावी म्हापशात वाचन कक्ष नाही

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

‘कोविड १९’ मुळे तसेच या महामारीमुळे आर्थिक स्थितीवर परिणाम झाल्याने खर्च कपात करण्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केल्यामुळे सध्या म्हापसा शहरातील वाचनकक्ष पुन्हा सुरू होऊ शकत नाही हे सरकारनेच केलेल्या स्पष्टीकरणामुळे उघडकीस आले आहे.

म्हापसा: ‘कोविड १९’ मुळे तसेच या महामारीमुळे आर्थिक स्थितीवर परिणाम झाल्याने खर्च कपात करण्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केल्यामुळे सध्या म्हापसा शहरातील वाचनकक्ष पुन्हा सुरू होऊ शकत नाही हे सरकारनेच केलेल्या स्पष्टीकरणामुळे उघडकीस आले आहे. यासंदर्भात ‘गोवा कॅन’ने पत्र पाठवले असता या प्रश्नाबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न संस्कृती खात्याने केला आहे, असा दावा संघटनेचे संघटक रोलण्ड मार्टिन्स यांनी केला आहे.

 

म्हापसा पालिका मंडळाच्या मालकीच्या ‘आथाईद पालिका ग्रंथालया’संदर्भात ‘गोवा कॅन’ने पत्र पाठवल्यानंतर त्यासंदर्भात कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप यांनी त्या संस्थेला पाठवलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे, की म्हापसा बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या म्हापसा पालिकेच्या मालकीच्या इमारतीतील दोन दुकानवजा गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यासंदर्भात म्हापसा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना १४ मे २०२० रोजी पत्र पाठवून वाचन कक्षासाठी राखीव ठेवलेल्या त्या दोन गाळ्यांचा आराखडा सादर करण्यास, तसेच त्या गाळ्यांच्या वापरासंदर्भात किती शुल्क आकारले जाईल यासंदर्भात कळवले आहे.

 

हे वाचनालय कला व संस्कृती खात्याकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय म्हापसा पालिकेने यापूर्वीच घेतलेला आहे, परंतु कित्येक महिने उलटले तरी गोवा सरकार आणि म्हापसा पालिका यांच्या दरम्यान त्यासंदर्भातील करार झालेलाच नाही. या ग्रंथालयाला जिल्हा ग्रंथालयाचा दर्जा देण्याचा निर्णय कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी काही महिन्यांपूर्वी घेतलेला होता, परंतु त्यानंतर टाळेबंदीमुळे त्यासंदर्भातील कार्यवाही मंदावली.

 

सध्या गोवा सरकारची आर्थिक परिस्थिती अतिशय खालावल्याने तसेच प्रत्येक बाबतीत काटकसर करण्याचे धोरण राज्य सरकारने अवलंबल्याने नजीकच्या काळात त्या निर्णयाला चालना मिळण्याची शक्यताच दिसत नाही.

 

या विषयासंदर्भात ‘गोवा कॅन’ने विविध शासकीय यंत्रणांशी सातत्याने पत्रव्यवहार केलेला आहे. कला व संस्कृती खात्याला पत्र पाठवून म्हापसा येथील वाचनकक्ष तसेच म्हापसा पालिकेचे आथाईद पालिका ग्रंथालय लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती केली होती. त्यासंदर्भात माहिती देताना रोलण्ड मार्टिन्स म्हणाले, हे ग्रंथालय गेल्या १३ सप्टेंबरपासून बंद असल्याने या ग्रंथालयाच्या वाचकांना तसेच त्या ग्रंथालयाचा वापर करून घेणाऱ्यांना त्यांच्या हक्कांपासून परावृत्त व्हावे लागले आहे.

 

मोठ्या संख्येने तिथे छोटी मुले, पुरुष, महिला आणि ज्येष्ठ  नागरिक अशा विविध वर्गांतील वाचकांची कोणतीही पर्यायी व्यवस्था म्हापसा पालिकेने अथवा गोवा सरकारने व्यवस्था केलेली नाही. ती मंडळी तिथे नियमितपणे येऊन तेथील वाचनकक्षाचा तसेच ग्रंथालयाचा लाभ घेत होती. म्हापसावासीयांसाठी तसेच परिसरातील लोकांसाठी उपलब्ध असलेले सार्वजनिक स्वरूपाचे एकमेव बौद्धिक भूक भागवण्याचे तसेच प्रमुख मनोरंजनाचे साधनच त्यामुळे नाहीसे झाले आहे.

 

आश्चर्याची बाब म्हणजे सुमारे चार महिन्यांपूर्वी कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी म्हापसा पालिकेच्या या ग्रंथालयाच्या इमारतीची पाहणी करून त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेशही दिले होते; पण, कोविडचे कारण पुढे करून त्या कामाला अद्याप प्रारंभही करण्यात आला नाही. या ग्रंथालयाला जिल्हा ग्रंथालयाचा दर्जा देण्याचा सरकारचा विचार असला तरी, मंत्र्यांची ती घोषणा कधी फलद्रूप होईल, हे नेमकेपणाने निदान आज तरी सांगता येत नाही.

 

ही गंभीर समस्या विद्यमान आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी निकालात काढण्यासाठी संबंधित अधिकारी आणि अन्य व्यक्तींची संयुक्त बैठक लवकरात लवकर घ्यावी, अशी सूचना गोवा कॅनचे संघटक रोलण्ड मार्टिन्स यांनी कला व संस्‍कृती खात्याच्या संचालकांना केली होती. त्यासंदर्भात संस्थेने म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी, पालिका प्रशासन खात्याचे संचालक तसेच हा ग्राहकवर्गाच्या हिताचा प्रश्‍न असल्याने नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याच्या संचालकांशीही पत्रव्यवहार केला आहे.

 

रवींद्र भवनाबरोबरच वाचनालयाचाही अभाव!

सध्या बार्देश तालुक्यातील नागरिकांना मनोरंजनासाठी एखादे परिपूर्ण सभागृह नाही. तालुकावासीयांचे रवींद्र भवनाचे स्वप्न तर अधांतरीच राहिले आहे. म्हापशातील एकमेव सार्वजनिक ग्रंथालय असलेले म्हापसा पालिकेचे १३६ वर्षांचा देदीप्यमान समृद्ध इतिहास असलेले ग्रंथालय ती इमारत मोडकळीस आल्याचे कारण पुढे करून सुमारे वर्षभरापासून बंदच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाचकांसाठी मनोरंजनासाठी असलेला एकमेव आधारही नाहीसा झाला आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या