डिचोलीत कृषी कार्ड नोंदणीसाठी प्रतिसाद नाही मात्र कृषी कर्जासाठी शेतकरी आग्रही

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

कृषीप्रधान डिचोली तालुक्‍यात एकूण तीन हजार ४१३ शेतकरी कृषी कार्डधारक आहेत. तसेच ७१६ शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचे लाभधारक आहेत. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

डिचोली: टाळेबंदी काळात डिचोलीत कृषी कार्ड नोंदणीसाठी विशेष प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र शेतीविषयक योजनांसह ‘केसीसी’ कर्ज किंवा सरकारच्या अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी कार्यालयातर्फे जागृती करण्यात येत आहे. केसीसी कर्ज वा अन्य योजनांसाठी अनेक शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाशी संपर्क साधला आहे.

केसीसी कर्ज आणि अन्य योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कृषी कार्यालयातर्फे पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती विभागीय कृषी कार्यालयातून उपलब्ध झाली आहे.

कृषीप्रधान डिचोली तालुक्‍यात एकूण तीन हजार ४१३ शेतकरी कृषी कार्डधारक आहेत. तसेच ७१६ शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचे लाभधारक आहेत. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

महिन्यापूर्वी म्हणजेच मागील १३ ऑगस्ट रोजी कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी डिचोलीत उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. 

शेतकऱ्यांबाबतीत सरकार संवेदनशील आहे. शेतकऱ्यांना आधार आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देणाऱ्या सुलभ योजना अंमलात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. अशी ग्वाही कृषीमंत्र्यांनी त्यावेळी शेतकऱ्यांना दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये चैतन्य पसरले असून, योजना त्वरित मार्गी लागाव्यात. अशी अपेक्षा शेतकरी व्यक्‍त करीत आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या