मडगाव पालिकेतील रोजंदारी कामगारांची वेतनाविना चतुर्थी

वार्ताहर
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

मडगाव नगरपालिकेत पगाराचा घोळ हा नित्याचाच विषय बनला आहे. यावर्षी पालिकेत रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना वेतनाविनाच गणेशचतुर्थीचा सण साजरा करावा लागला.

नावेली: मडगाव नगरपालिकेत पगाराचा घोळ हा नित्याचाच विषय बनला आहे. यावर्षी पालिकेत रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना वेतनाविनाच गणेशचतुर्थीचा सण साजरा करावा लागला. याबरोबरच कायम असलेल्या कर्मचाऱ्यांनाही  पगारापासून वंचित रहावे लागले. एखाद्या महिन्यातील २० तारखेनंतर कोणताही मुख्य सण आल्यास त्यांना वेतन देण्यात येत होते. मात्र, यावर्षी तसे झाले नाही. त्यामुळे पालिकेतील रोजंदारीवरील कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गोव्यातील एक मुख्य सण म्हणजे गणेशचतुर्थी असून ती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. १०० हून अधिक  कामगारांना जुलै महिन्यातील वेतन देण्यात आलेले नाही.

गणेशचतुर्थीपूर्वी पगार देण्याविषयी त्यांनी मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांची भेट घेऊन मागणी होती. या दरम्यान २१ ऑगस्ट रोजी आपल्या बँक खात्यामध्ये पगार जमा करण्यात येईल असे एका नगरसेवकाने आश्वासन दिले होते. मात्र, रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या खात्यात  पगार जमा झालाच नाही आणि २२ व २३ ऑगस्ट रोजी चतुर्थी आली असल्याने त्यांना पगाराशिवाय गणेशचतुर्थी साजरी करावी लागली. सोमवारी २४ ऑगस्ट रोजी काहींच्या खात्यात त्यांचा पगार जमा झाला असल्याचे या कामगारांनी सांगितले.

संबंधित बातम्या