डिचोलीत सामाजिक सुरक्षित अंतराचा फज्जा

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

कोरोना महामारीचा संसर्ग डिचोली शहरासह आजूबाजूच्या परिसरात फैलावत असल्याने धास्ती वाढत असली, तरी सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याकडे बरेचजण दुर्लक्ष करीत असल्याचे आढळून येत आहे.

डिचोली: एका बाजूने कोरोना महामारीचा विळखा घट्ट होत असतानाच, दुसऱ्या बाजूने मात्र डिचोलीत ‘विड’संबंधीच्या सरकारी मार्गदर्शक तत्वांचे पालन होत नसल्याचे आढळून येत आहे. डिचोली बाजारासह शहरात तर सामाजिक सुरक्षित अंतराचा निव्वळ फज्जा उडत असल्याचे बऱ्याचदा आढळून येत आहे. काही भागात तर मुले आणि युवावर्ग जमाव करू फुटबॉल यासारखे मैदानी खेळ खेळताना दिसून येत आहेत.

 

कोरोना महामारीचा संसर्ग डिचोली शहरासह आजूबाजूच्या परिसरात फैलावत असल्याने धास्ती वाढत असली, तरी सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याकडे बरेचजण दुर्लक्ष करीत असल्याचे आढळून येत आहे. यामुळे डिचोलीत कोरोनाची धास्ती वाढली आहे. नाही म्हटले, तरी प्रशासकीय यंत्रणा आपापल्यापरीने प्रयत्न करीत असले, तरी बेफिकीर जनतेमुळे प्रशासकीय यंत्रणाही हतबल होत आहे. डिचोली पालिका क्षेत्रातील मुस्लिमवाडा, गावकरवाडा, बोर्डे, सुधा कॉलनी, नाईकनगर या भागात मिळून १२ हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. सरकारी कार्यालयापर्यंतही कोरोना पोचला आहे. त्यामुळे शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट असतानाही काही नागरिकांकडून मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने शहरात चिंतायुक्‍त वातावरण पसरले आहे.

 

कोरोना महामारीचे संकट टळावे यासाठी शहरात जागृती आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. बाजारातील गर्दीवर नियंत्रण येण्यासाठी जून महिन्यापासून पालिकेने साप्ताहीक बाजारावरही कडकपणे निर्बंध आणले आहेत. त्यामुळे महिनाभर बाजारातील गर्दीवर बरेच नियंत्रण आले होते. मात्र, आता मागील काही दिवसांपासून नियमितपणे बाजारात वर्दळ वाढत आहे. जीवनावश्‍यक वस्तू वा अन्य खरेदीसाठी नागरिकांची पावले बाजारपेठेत वळतात. खरेदीसाठी बाजारातील किराणा, भाजी आदी दुकानांसमोर मागील काही दिवसांपासून नियमितपणे गर्दी होत असली, तरी बरेचजण सामाजिक अंतराचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. काही बॅंकांसमोरही ग्राहक नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळून येत आहे. यामुळे जागृत जनतेमध्ये भीती व्यक्‍त होत आहे.

 

मैदानी खेळ जोरात...

शहरातील तसेच जवळपासच्या भागात सध्या मैदानी खेळही जोरात सुरू आहेत. विविध ठिकाणच्या मैदानावर मागील काही दिवसांपासून मुले आणि युवावर्ग फुटबॉल यासारखे मैदानी खेळ खेळताना दिसून येत आहेत. मैदानी खेळ खेळताना मुले आणि युवकांचा मोठा जमाव असतो. या प्रकाराकडे कोणाचेच लक्ष जात नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या