टाळेबंदीतही ड्रग चा अमल; ‘एएनसी’कडून १.८७ कोटींचा साठा जप्त

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

अमलीपदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी ४.२७ किलो विविध प्रकारचा १.८७  कोटींचा ड्रग्ज जप्त केला आहे. ९ प्रकरणे नोंद करून १० जणांना अटक केली.

पणजी: राज्यात ‘कोविड - १९’च्या पार्श्‍वभूमीवर टाळेबंदीमुळे पर्यटन व्यवसाय ठप्प असताना किनारपट्टीवरील भागात ड्रग्जचा व्यवहार रेव्ह पार्ट्यांमध्ये सुरूच आहे. अमलीपदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी ४.२७ किलो विविध प्रकारचा १.८७  कोटींचा ड्रग्ज जप्त केला आहे. ९ प्रकरणे नोंद करून १० जणांना अटक केली. त्यामध्ये ७ विदेशी व ३ देशी संशयितांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांतील ६४ प्रकरणे कोविडमुळे न्यायालयात प्रलंबित आहेत. 

या कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार किनारपट्टी परिसरात पर्यटन मोसम सुरू नसला, तरी बेकायदा लहानसहान पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा व्यवहार सुरूच आहे. यावर्षी या कक्षाने कोकेन, एमडीएमएम व हेरॉईन यासारख्या उच्च दर्जाचे ड्रग्ज संशयितांकडून जप्त केला आहे. त्यामध्ये काही प्रमाणात चरसचाही समावेश आहे. किनारपट्टी परिसरातील हॉटेल्स बंद आहेत. मात्र, काही बंगल्यामध्ये या पार्ट्या आयोजित केल्या जात आहेत. हल्लीच क्राईम ब्रँचने केलेल्या छाप्यात या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या पार्ट्या काही मोजक्याचजणांना व्हॉट्‍सॲपचा वापर करून आमंत्रित केले जाते. त्यामुळे किनारपट्टी भागात या कक्षाने गेल्या काही महिन्यांपासून गस्त घालण्यास सुरवात केली आहे. काही विदेशी नागरिक टाळेबंदीच्या काळात स्वतःच्या देशात परतलेले नाहीत. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी हे ड्रग्ज व्यवहारात आहे त्यामुळे त्यांची रस्त्यावर हिंडताना झडती घेतली जाते, अशी माहिती या कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

२०१८ मध्ये अमलीपदार्थविरोधी कक्षाने ३१ प्रकरणे नोंद केली होती, त्यामध्ये ३५ जणांना अटक केली होती. त्यामध्ये २१ देशी, तर १४ विदेशी संशयितांचा समावेश आहे. २३ किलो ड्रग्ज जप्‍त केला व त्याची किंमत सुमारे १ कोटी १५ लाख ११ हजार रुपये होती. २०१९ मध्ये २७ प्रकरणे नोंद झाली, त्यात ३० जणांना अटक झाली. त्यातील प्रत्येकी १५ संशयित देशी व विदेशी होते. २७.७५ किलो ड्रग्ज जप्त केला व त्याची किंमत १ कोटी ५६ लाख ६० हजार ५०० रुपये होती. ऑगस्ट २०२० पर्यंत ९ प्रकरणे नोंद झाली असून त्यात ३ देशी व ७ विदेशी संशयितांचा समावेश आहे. ४.२७ किलो ड्रग्ज जप्त केला असून त्याची किंमत १ कोटी ८७ लाख ३० हजार रुपये आहे. 

गेल्या तीन वर्षात ६७ प्रकरणे नोंद झाली आहेत त्यातील ६४ प्रकरणांमध्ये संशयितांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, तर ३ प्रकरणांचा तपास सुरू आहे. यावर्षी मार्च २०२० पासून न्यायालयातील कामकाज कोविडमुळे थंडावले आहे. काही महत्त्वाची प्रकरणे वगळता आरोपपत्रांवरील सुनावणी बंद ठेवण्यात आली आहे. आभासी सुनावणी सध्या सुरू असल्याने काही संशयितांनी उच्च न्यायालयात सुनावणीसाठी अर्जही केले आहेत. मात्र, कोविडमुळे ही सुनावणी शक्य नसल्याने ते निकालात काढण्यात आले आहेत.

पोलिस खात्याच्या अमलीपदार्थविरोधी कक्ष, क्राईम ब्रँच, उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पोलिसांनी २०१६ ते २०२० या पाच वर्षाच्या काळात ७४१ गुन्हे दाखल झाले आहेत, तर ८४१ जणांना अटक झाली आहे. सुमारे १८ कोटींचा एकूण ३८२ किलो ड्रग्जसाठा जप्त केला आहे. २०१८ ते २०१९ या काळात २०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल होते. ड्रग्ज माफिया व पोलिस यांच्यातील लागेबांधेबाबत टीका झाल्यावर त्या काळात पोलिसांनी तीव्र मोहीम सुरू करून किरकोळ ड्रग्ज विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली होती

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या