राज्यात ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार....

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

राज्यात ध्वनी प्रदूषण होण्यापासून रोखा, अशी सूचना पर्यावरण संचालकांनी उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, उत्तर व दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव, वाहतूक संचालक आणि पर्यटन संचालकांना केली आहे.

पणजी: राज्यात ध्वनी प्रदूषण होण्यापासून रोखा, अशी सूचना पर्यावरण संचालकांनी उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, उत्तर व दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव, वाहतूक संचालक आणि पर्यटन संचालकांना केली आहे. त्यासाठीचा कृती आराखडाही तयार करून पर्यावरण संचालकांनी या अधिकाऱ्यांना पाठवला आहे.

राज्यात सार्वजनिक ध्वनिक्षेपक यंत्रणा, आवाज करणारी संगीत वाद्ये, ध्वनिवर्धक यांची विक्री बाह्य भागातील आवाज नियंत्रक बसवल्याशिवाय केली जाऊ नये असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. लाऊड स्पीकरचा वापर करायचा असल्यास त्या जागेची पाहणी केल्यानंतरच परवानगी देणे किंवा न देणे याचा निर्णय घेतला जावा अशी सूचनाही पर्यावरण संचालकांनी केली आहे. डिझेलवर चालणारी जनित्रांची खरेदी विक्रीही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मानकांप्रमाणेच करावी असे पर्यावरण खात्याचे म्हणणे आहे. खासगी जागेतील आवाजाची मर्यादा पाच डेसिबल्सपेक्षा जास्त नको याकडे कटाक्ष हवा असे पर्यावरण संचालकांनी या अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

सार्वजनिक ठिकाणी आवाजाची मर्यादा १० डेसिबल्‍सपेक्षा जास्त नको असे नमूद करून म्हटले आहे, की या साऱ्याची अंमलबजावणी करण्यासाठी गोवा राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यभरातील ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजावी त्याचा खर्च पर्यावरण खाते करणार आहे. 

संबंधित बातम्या