ऑनलाईनच नव्हे, शिक्षकच विद्यार्थ्यांच्या दारात...

Manoday Phadte
शुक्रवार, 31 जुलै 2020

कोरोना महामारीच्या कठीण प्रसंगात शिक्षण, शाळा, शारीरिक व्यायाम, सर्व गोष्टींना फाटा देत सरकार ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून प्रयत्न करीत असल्यामुळे जून, जुलै या दोन महिन्यात प्रामाणिकपणे किती मुलांनी अभ्यास केला असेल हे सांगणे कठीण आहे. ग्रामीण भागात तर विचारूच नका. एक तर ऑनलाईन नेटवर्कचा अडथळा आणि असल्यास काही पालकांना त्यातले काही समजणार नाही अशी स्थिती. या सर्व कटकटींना फाटा देत वाडे कुर्डी सरकारी हायस्कूलच्या मुख्याध्यपिका ज्योती देसाई यांनी शिक्षण क्षेत्रात अभिनंदनीय असा शैक्षणिक प्रयोग सुरू केला आहे.

सांगे

ऑनलाईनच नव्हे, शिक्षकच विद्यार्थ्यांच्या दारात अशाप्रकारचा हा उपक्रम असून याद्वारे आठवड्यातून एकदा ज्या त्या भागातील विद्यार्थ्यांना एकत्र गोळा करून तेथे ऑनलाईन शिकविलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी घेणे, अभ्यासाचे नवीन नोट्स सर्वांना वाटणे, समस्यांचे निवारण करणे आणि शारीरिक व्यायम घेणे असा हा उपक्रम आहे. या उपक्रमाचे पालकांनी जोरदार स्वागत केले आहे. हा आदर्श उपक्रम संपूर्ण राज्यात राबविल्यास पालकांकडून स्वागत करण्यात येईल, अशी अपेक्षा वाडे कुर्डीतील पालकांनी व्यक्त केली आहे.
वाडे कुर्डी सरकारी हायस्कूलच्या मुख्याध्यपिका ज्योती देसाई या शिक्षणाच्या बाबतीत जितक्या कडक शिस्तीच्या आहेत, तितक्याच त्या विद्यार्थीवर्गात प्रियही आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणामुळे व्यवस्थित शिक्षण मिळत नाही. विद्यार्थी दिलेला अभ्यास व्यवस्थित करतील की नाही, सर्वच पालकांना महागडे मोबाईल खरेदी करणे परवडणार नाही. शिक्षकांसमोर दिसल्याशिवाय विद्यार्थ्यांत शिस्त लागत नाही आणि विद्यार्थी समोर नसल्यास शिक्षकांना शिकविण्यास रुची निर्माण होत नसते. या सर्व गोष्टींचा विचार करून ज्योती देसाई यांनी पालक शिक्षक संघाला विश्वासात घेत सर्व शिक्षकांना बरोबर घेऊन नवा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाचे पालकवर्गात जोरदार समर्थन करण्यात येत आहे.
वाडे कुर्डी हायस्कूलमध्ये ज्या ज्या भागातून विद्यार्थी येत असतात, त्या त्या भागात जाऊन गावातील एका सभा मंडपात किंवा शाळेच्या पटांगणात विद्यार्थ्यांना एकत्र करण्यात आले. त्यात पाचवीपासून दहावीपर्यंतच्या सर्व मुलांचा समावेश असतो. आतापर्यंत ऑनलाईन दिलेल्या अभ्यासाची उजळणी घेणे, दिलेल्या नोट्सची तपासणी करणे, ज्यांना नेटवर्क मिळत नसल्याने नोट्स मिळाले नाहीत, त्यांना नोट्सकॉपी देणे, शारीरिक शिक्षकाकडून थोडा व्यायाम शिकविणे, पालकांच्या काही अडचणी समजून घेणे अशा सरावाच्या काही गीष्टी तास, दीड तासात उरकून घेतल्या जातात आणि दिलेला अभ्यास नीट करा पुढील आठ दिवसात याच ठिकाणी याचवेळी सर्वांनी हजर राहण्याचा सल्ला देण्यास मुख्याध्यपिका ज्योती देसाई विसरत नाहीत.
पुढील हाच सराव अन्य ठिकाणाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून घेतला जात आहे. मास्क सक्तीने वापरले जात असते. हात सेनेटाइझ केले जातात. दोन विद्यार्थ्यांत सामाजिक अंतर पाळले जाते. या पद्धतीने हायस्कूलमध्ये येणाऱ्या प्रत्येक भागातील सार्वजनिक ठिकाणी शिक्षक वर्गाला सोबत घेऊन शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली दरी कमी करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांत उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यासाठी मुख्याध्यपिका ज्योती देसाई यशस्वी ठरल्या आहेत. मोबाईल असलेल्यांना नेटवर्क नाही आणि नेटवर्क असलेल्या गावात काही विद्यार्थ्यांजवळ मोबाईल नाही. ही समस्या मिटणारच त्याच बरोबर ऑनलाईनच्या नावाने दिवसभर ‘गेम’ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडी चपराकही बसली आहे. अशापद्धतीने हायस्कूलातील सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात येत आहे.
यासंदर्भात पालक शिक्षक संघांचे अध्यक्ष अनिल काकोडकर म्हणाले, की या उपक्रमातून मुलांचे एकवर्ष वाया जाणार ही भीती दूर झाली व नेटवर्क नसलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान टळले आहे. व्यवस्था समितीचे अध्यक्ष शंभू भंडारी म्हणाले, या उपक्रमाला पालकांचा पाठिंबा मिळाला असून एकटाच घरी बसून अभ्यास करण्यापेक्षा चारजण एकत्र येऊन अभ्यास केल्यास वर्ष वाया जाणार नसल्याची खात्री पटली आहे. हायस्कूल मुख्याध्यपिका ज्योती देसाई यांनी उचललेले पाऊल योग्य असल्याचे अनेक पालकांनी सांगितले.

गेल्या दोन महिन्यांत विद्यार्थी आणि शिक्षक यांचा संपर्क झाला नव्हता. त्यात ऑनलाईनमुळे शिक्षण कठीण बनले आहे. म्हणून एक सामाजिक उपक्रम म्हणून पालकांना बरोबर घेऊन सोयीस्कर ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांना बोलावून घेतले. दिलेल्या अभ्यासाची उजळणी घेतली. शक्य नसलेल्या नोट्सकॉपी दिल्या. पालकांच्या अडचणी समजून घेतल्या. काही पालकांना मोबाईल खरेदी करणे शक्य नाही, त्यांनी तो मुळीच घेऊ नये. इतर मुलांकडून नोट्स घ्यावे किंवा शिक्षकांना संपर्क करा, ते देण्याची व्यवस्था करतील. पालकांनी हाच उपक्रम प्रत्येक आठवड्यातून एकदा करण्याची सूचना केली आहे. सर्व ती काळजी घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची आपल्या शिक्षक वर्गाची तयारी सुरू झाली आहे.
ज्योती देसाई (मुख्याध्यापिका, वाडे कुर्डी सरकारी हायस्कूल)

संपादन - यशवंत पाटील

 

संबंधित बातम्या