राज्यातील बुद्धिमत्ता गेली कुठे?

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

गोवा लोकसेवा आयोगाने अनेक पदे भरण्यासाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत अनेक पदांसाठी एकही उमेदवार लेखी परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकला नसल्याची घटना घडली आहे. यामुळे राज्यात दहावी, बारावीच्या निकालाचे उच्चांक प्रस्थापित होत असतानाच बुद्धिमत्ता गेली कुठे गेली असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पणजी- लेखा संचालनालयाने घेतलेल्या लेखापाल पदासाठीच्या लेखी परीक्षेत सर्व उमेदवार नापास झाल्याची घटना अद्याप विस्मृतीत गेलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा लोकसेवा आयोगाने अनेक पदे भरण्यासाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत अनेक पदांसाठी एकही उमेदवार लेखी परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकला नसल्याची घटना घडली आहे. यामुळे राज्यात दहावी, बारावीच्या निकालाचे उच्चांक प्रस्थापित होत असतानाच बुद्धिमत्ता गेली कुठे गेली असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाण खात्यातील भूगर्भतज्ज्ञ, सहायक कृषी अधिकारी, सहायक संचालक समाजकल्याण, सहायक शिक्षण संचालक, भूगोल, मराठी, हिंदी, वनस्पतिशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, फाईनआर्ट विषयातील सहायक प्राध्यापक अशा ४८ पदांसाठी आयोगाने संगणकावर आधारीत लेखी परीक्षा घेतली. या परीक्षेत एकही उमेदवार उत्तीर्ण झाला नाही. ही परीक्षा ७५ गुणांची होती व ७५ प्रश्नांच्या उत्तरावर क्लिक करण्यासाठी ७५ मिनिटे दिली होती. बरोबर उत्तरासाठी एक गुण तर चुकीच्या उत्तरासाठी शून्य गुण या पद्धतीने या उत्तरपत्रिकांचे परीक्षण करण्यात आले. 

त्यांनी सांगितले की आयोगाने याशिवायही अनेक पदांसाठी संगणकावर आधारीत परीक्षा घेतली. त्या सर्व परीक्षांत मिळून एकूण १६.९ टक्केच उमेदवार तोंडी मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. आयोगाने एकूण २०८ पदांसाठी ही परीक्षा घेतली होती. त्यासाठी १ हजार ६७ जणांनी अर्ज केले होते. ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान फातोर्डा येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेला प्रत्यक्षात १ हजार ७५ जणच उपस्थित राहिले. त्यातील केवळ १८२ जण तोंडी मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. 

उच्च शिक्षण संचालनातील ९३ पदे भरण्यासाठीही आयोगाने परीक्षा घेतली. त्यासाठी १ हजार १८ जणांनी अर्ज केले होते. प्रत्यक्षात ५९० जणांनी परीक्षा दिली. त्यातील केवळ ९३ जण तोंडी मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. परिचारिका महाविद्यालयातील १९ पदे भरण्यासाठी आयोगाने जाहिरात दिली होती. त्यासाठी ७६ जणांनी अर्ज केले पण ५१ जणांनी परीक्षा दिली. त्यातील १४ जण तोंडी मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. गोवा दंत वैद्यकीय महाविद्यालयातील २९ जागांसाठी  १८२ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी १२५ जणांनी परीक्षा दिली आणि ६९ जण तोंडी मुलाखतीसाठी पात्र ठरले आहे. याशिवाय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी,  सहायक प्राध्यापक वास्तुशास्त्र, नियोजन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठीही उमेदवार पात्र ठरले.

संबंधित बातम्या