म्हापशातील राजकीय पटलावर एके काळी वैश्य समाजाचा पगडा होता

सुदेश आर्लेकर
सोमवार, 3 मे 2021

म्हापसा शहरात सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी असलेली वैश्य समाजाची राजकारणावरील जबरदस्त पकड आता पूर्णत: ढिली झाली आहे. म्हापशातील राजकीय पटलावर एके काळी वैश्य समाजाचा पगडा होता. 

म्हापसा: म्हापसा शहरात सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी असलेली वैश्य समाजाची राजकारणावरील जबरदस्त पकड आता पूर्णत: ढिली झाली आहे. एक काळ असा होता, की म्हापशात विधानसभा निवडणुकीचा उमेदवार अथवा म्हापसा पालिकेसाठीचे उमेदवार ठरवताना जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांकडून वैश्य समाजातील नेत्यांना आवर्जून विश्वासात घेतले जात होते; परंतु, आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्याचाच परिणाम असा झाला, की सध्या वैश्य समाजातील एकही व्यक्ती म्हापसा पालिका मंडळावर नाही.(not a single person from the Vaishya community is on the Mapusa Palika Mandal)

म्हापशातील राजकीय पटलावर एके काळी वैश्य समाजाचा पगडा होता. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कार्यकाळातही म्हापशातील वैश्य समाजातील नेत्यांना राजकारणाबाबत विशेष मान होता; तथापि, तो मान आज राहिलेलाच नाही. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी वैश्य समाजातील नेत्यांची मते म्हापसा शहरातील राजकारणाबाबत आवर्जून जाणून घेतली जायची. म्हापशातील व्यापारी हे पूर्वी प्रामुख्याने वैश्य समाजातील असायचे व त्यांचे म.गो. पक्षावर तसेच भाऊसाहेब बांदोडकर यांच्यावर अतोनात प्रेम असायचे. तसेच, त्या काळात म्हापशात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचाच उमेदवार हमखास निवडून येत असल्याने वैश्य समाजातील ते व्यापारीबंधू म.गो. पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भरघोस आर्थिक साहाय्यही करायचे. म्हापसा विधानसभा मतदारसंघासाठी गोपाळराव मयेकर यांच्यासारख्या अन्य समाजांतील नेत्यांची नावे सुचवण्याबाबतही वैश्य समाजातील नेत्यांचा त्या काळात पुढाकार होता. परंतु, वैश्य समाजाचे ते वर्चस्व हळूहळू कमी होत गेले व आता तर ते पूर्तत: नाहीसे झाले आहे.

म्हापसा विधानसभा मतदारसंघातून आतापर्यंत रघुनाथ टोपले (1963), गोपाळराव मयेकर (1969), रघुवीर पानकर (1972). सुरेंद्र सिरसाट (1973, 1989 व 1994 : तीन वेळा), श्यामसुंदर नेवगी (1980), चंद्रशेखर ऊर्फ बाबू दिवकर (1984), फ्रांसिस डिसोझा (1999, 2002, 2007, 2012, 2017 : सलग पाच वेळा) अशा व्यक्ती आमदारपदी निवडून आल्या होत्या. वर्ष 2019 मधील पोटनिवडणुकीत फ्रांसिस डिसोझा यांचे पुत्र ज्योशुआ डिसोझा आमदारपदी निवडून आले. या भूतपूर्व आमदारांपैकी रघुनाथ टोपले, सुरेंद्र सिरसाट, श्यामसुंदर नेवगी, चंद्रशेखर दिवकर ही मंडळी वैश्य समाजातील होती. वर्ष 1999 पासून आजपर्यंत अर्थांत सुमारे वीस-एकवीस वर्षे वैश्य समाजातील व्यक्ती म्हापशाच्या आमदारपदी निवडून आली नाही, ही वस्तुस्थिती आहे.

Goa Lockdown: कदंब बससेवा, मासळी मार्केट सात ते सात सुरू 

म्हापसा पालिकेवरही पूर्वी वैश्य समाजातील नेत्यांचे वर्चस्व असायचे. पण, ते वर्चस्व कालांतराने हळूहळू कमी होत गेले. मागच्या पालिका मंडळात संदीप फळारी, तुषार टोपले व संजय मिशाळ असे तीन वैश्य समाजातील कार्यकर्ते होते. तथापि, प्रभागांच्या राखीवतेमुळे त्या तिघांनाही यंदाची पालिका निवडणूक लढवणे शक्य झाले नाही. सध्या वैश्य समाजातील एकही नगरसेवक पालिका मंडळावर नाही. प्रभाग दहामधून निवडून आलेल्या प्रिया मिशाळ या केवळ अंशत: वैश्य समाजातील आहेत असे म्हणायला हरकत नाही; तथापि, विवाहापूर्वी त्या भंडारी समाजातील होत्या व त्या वैश्य समाजातील व्यक्तीशी विवाहबद्ध झाल्या असून शासकीय नियमानुसार त्या इतर मागासवर्गीय गटातील ठरतात व त्याच राखीवतेच्या साहाय्याने त्या निवडून आल्या आहेत.

नेत्रावळी गावात त्या घरातील एकमेव तरुणावर काळाने घातली झडप 

दरम्यान, वैश्य समाजातील नेते असलेले संदीप फळारी यांच्याकडे ‘म्हापसा विकास आघाडी’ या भाजपसमर्थक गटाच्या प्रचाराची धुरा सोपवण्यात आली होती. तथापि, त्यांनीही वैश्य समाजातील एकाही उमेदवाराचे नाव भाजपसमर्थक गटाच्या वतीने पुढे केले नाही, याबद्दल आश्यर्य व्यक्त केले जात आहे. म्हापशातील वैश्य समाज म्हणजे भाजपची एकगठ्ठा मते होती; तथापि, या निवडणुकीत वैश्य समाजाला प्रतिनिधित्व दिले नसल्याने त्याचा फटका भाजपला बसला अशा प्रत्रिकया लोकांमध्ये व्यक्त केल्या जात आहेत.
यंदाच्या पालिका निवडणुकीत गोमंतक मराठा समाजालाही प्रतिनिधित्व मिळाले नाही. या पूर्वी रोहन कवळेकर ही त्या समाजातील व्यक्ती नगरसेवकपदी होती. यंदा त्यांच्या पत्नी मनीषा कवळेकर यांना भाजपापुरस्कृत गटाने उमेदवारी दिली होती. तथापि, त्या निवडून येऊ शकल्या नाहीत.

सर्वाधिक नगरसेवक भंडारी समाजातील!
म्हापसा पालिका मंडळावरील वीसपैकी सर्वाधिक उमेदवार भंडारी समाजातील आहेत. सुधीर कांदोळकर, तारक आरोलकर, विकास आरोलकर, आनंद भाईडकर, शुभांगी वायंगणकर, सुशांत हरमलकर, नूतन बिचोलकर अशा सात नगरसेवकांचा त्यात समावेश आहे. ब्राह्मण, दैवज्ञ ब्राह्मण, खारवी, अनुसूचित जाती, 96 कुळी मराठा, न्हावी अशा अन्य वर्गांनाही प्रतिनिधित्व मिळाले आहे. परंतु, त्यापैकी काही जण राखीवतेच्या साहाय्याने निवडून आले आहेत.

संबंधित बातम्या