तेलंगण भारताचा भाग नाही?

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

महापूराचे पाणी ओसरल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे तेलंगण ढवळून निघत आहे. तेलंगण हा भारताचा भाग नाही का, हैदराबादच्या जनतेला मदत करणे पंतप्रधान मोदी यांचे कर्तव्य नाही का, असा सवाल तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) खासदार डॉ. जी. रणजीत रेड्डी यांनी केला.

हैदराबाद: महापूराचे पाणी ओसरल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे तेलंगण ढवळून निघत आहे. तेलंगण हा भारताचा भाग नाही का, हैदराबादच्या जनतेला मदत करणे पंतप्रधान मोदी यांचे कर्तव्य नाही का, असा सवाल तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) खासदार डॉ. जी. रणजीत रेड्डी यांनी केला.

टीआरएस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात शब्दयुद्ध सुरू झाले. केंद्राने अद्याप मदत दिली नसल्याचा दोष दोन्ही पक्षांनी एकमेकांना दिला आहे. दुसरीकडे टीआरएस सरकारला पूर योग्य पद्धतीने हाताळता आला नाही, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आले.
ऑक्टोबरमधील महापूरात नऊ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे राज्य सरकारने प्राथमिक आढाव्यानंतर केंद्राला कळविले होते. नगरविकास मंत्री के. टी. रामाराव यांनी सांगितले की, पाऊस ओसरण्यापूर्वीच राव यांनी ५५० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. गरज पडल्यास आम्ही हैदराबादसाठी आणखी शंभर कोटी रुपयांची मागणी करू.
केंद्रीय गृह राज्य मंत्री किशन रेड्डी यांनी सांगितले की, तेलंगण सरकारकडे केंद्राने तीन वेळा अहवाल मागितला, पण सविस्तर अहवाल पाठवण्याऐवजी भाजपवर टीका करण्यास टीआरएस प्राधान्य देत आहे.

निवडणुकीचा संदर्भ
हैदराबाद महानगरपालिकेची निवडणूक येत्या जानेवारीत होणार आहे. त्यामुळे तेलंगण राष्ट्र समिती आणि भाजप यांच्यात महापूरावरून राजकारण करून एकमेकांना शह-काटशह दिले जात आहेत.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ६६९ कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केल्यानंतर मोदी यांनी चार दिवसांत प्रतिसाद दिला. तेलंगणसाठी के. चंद्रशेखर राव यांनी एक हजार ३५० कोटी रुपयांची मागणी करून सुमारे २५ दिवस उलटले तरी काहीही हालचाल झालेली नाही.
- डॉ. जी. रणजीत रेड्डी, टीआरएस खासदार

तेलंगणमध्ये भाजपचा विजय व्हायला हवा आणि कौटुंबिक स्वरूप प्राप्त झालेली टीआरएस पक्षाची सद्दी संपली पाहिजे. 
- किशन रेड्डी, भाजप खासदार

संबंधित बातम्या