परिपत्रक मागे घेण्यासंदर्भात पंचायत संचालकांना नोटीस

प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

अखिल गोवा पंचायत लोकशाही मंच न्यायालयात दाद मागणार

म्हापसा: कायद्याचा भंग करणारे परिपत्र सात दिवसांच्या आत मागे घेण्यात यावे, अन्यथा न्यायालयाकडे दाद मागणार अशा आशयाचे नोटिसवजा निवेदन अखिल गोवा पंचायत लोकशाही मंचाच्या वतीने पंचायत संचालक नारायण गाड यांना सादर करण्यात आले आहे.

मंचाचे सचिव जोसेफ वाझ यांच्यावतीने ही नोटीस ॲड. झेलर डिसोझा यांच्या माध्यमातून पंचायत संचालकांना दिली आहे. सडयेचे माजी सरपंच फ्रान्सिस फर्नांडिस व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचायत संचालकांची भेट घेऊन त्यांना ती नोटीस सादर केली आहे.

यासंदर्भात फ्रान्सिस फर्नांडिस म्हणाले, यापूर्वी संबंधित शासकीय तांत्रिक अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणानुसार तसेच अहवालानुसार गटविकास अधिकारी विकासकामांबाबत तांत्रिक मंजुरी द्यायचे व त्यानंतर संबंधित पंचायती निविदांच्या माध्यमातून कंत्राटदारांना कामाच्या ऑर्डर्स द्यायच्या. ती जुनीच पद्धत सर्व पंचायतींना सोईस्कर होती, पण हल्लीच पंचायत संचालकांनी एक परिपत्रक काढून अशा कामासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण केलेल्या फाईल्स मंजुरीसाठी पंचायत संचालनालयात पाठवण्याचे सूचित केले आहे. ही नवीन पद्धत सर्व पंचायतींना त्रासदायक होणार आहे.

 गोवाभरातील पंचायतींच्या सरपंचांना, पंचसदस्यांना वगैरे अशा कामांच्या मंजुरीसाठी दूरवरून पणजीला खेपा माराव्या लागतील.

या पद्धतीऐवजी गरज भासल्यास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मंजुरीसाठी वेगळ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करता येईल. त्यामुळे कामाचेही विकेंद्रीकरण होईल, असेही श्री. फर्नांडीस म्हणाले. राज्य सरकारने या समस्येत  लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित बातम्या