आता गोवंशाची माहिती डिजिटल स्वरूपात; नाणूसच्या गोसंवर्धन केंद्रात संकलन

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

बुधवारी गोशाळेतील ४६५ गोवंशाची माहिती संकलित करण्यात आली आहे. या गुरांची माहिती येत्या सोमवारी इंटरनेटवर पाहता येईल, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रघुनाथ धुरी यांनी दिली आहे. 

वाळपई: प्रत्येक व्यक्तीची माहिती आधार कार्डद्वारे संग्रहीत केलेली आहे. या आधारद्वारे आपली सर्व सविस्तर माहिती मिळते.  त्याच धर्तीवर आता गोवंशांची जसे देशी गाय, बैल, वासरु, पाडे यांची देखील सविस्तर माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध व्हावी, यासाठी वाळपई-नाणूस येथील अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रात संकलन करण्यास सुरुवात झाली. हा गोव्यातील पहिलाच उपक्रम आहे.

आज बुधवारी गोशाळेतील ४६५ गोवंशाची माहिती संकलित करण्यात आली आहे. या गुरांची माहिती येत्या सोमवारी इंटरनेटवर पाहता येईल, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रघुनाथ धुरी यांनी दिली आहे. 

डॉ. धुरी म्हणाले, गुरे, म्हशी, बैल इत्यादी गोवंशाची माहिती पेपरावर नमूद करून संकलित केली, तर हे पेपर कधी कधी गायब झाल्यानंतर गोवंशाची माहिती मिळणे कठीण होते. या डिजिटल माहिती तंत्रज्ञानाद्वारे गाईच्या तोंडाच्या पुढच्या भागाचा फोटो काढला जातो. जसे माणसांच्या अंगठ्यांचे ठसे घेतले जातात. तसेच गायींच्या तोंडाचे ठसे स्वरूपात घेतले आहे. असे दहा फोटो व अन्य मिळून पंचवीस फोटो काढले जातात. तसेच गाय, बैल यांची उंची, वजन, रंग, रूप, आकार, शेपटी इत्यादी गोष्टी सॉफ्टवेअरमध्ये नोंदवल्या जातात. त्यातून त्या गायीची, बैलाची सविस्तर माहिती संगणकीकृत होते. ही माहिती कुठेही पाहता येते.  गोवंशाची माहिती डिजिटल पद्धतीने साठवल्यानंतर या माहितीच्या आधारे व्यवस्थापन समस्या सोडविणे, प्रजनन प्रक्रिया, दूध उत्पादन इत्यादी समस्या केंद्रित करून त्या सोडविण्यासाठी वाव मिळणार आहे. तसेच गोवंश विक्री करतेवेळी बाजारातील किंमत यांची पडताळणी करता येईल. 

जनावरांच्या चोरीचे प्रकारही कमी होतीतल. या डिजिटल माहितीच्याद्वारे गोवंशाची ओळख पटविता येणार आहे. त्यातून बेकायदा गुरांची कत्तल रोखता येईल, असेही डॉ. धुरी यांनी सांगितले.

बेळगावच्या युवकांचे योगदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही संकल्पना योजनेद्वारे हा उपक्रम राबविण्यात येत असून बेळगाव येथील अभियंते प्रसाद देसाई व सुदीप हुकेरी यांनी त्यासाठी खास सॉफ्टवेअर तयार केले आहे. एनिमल डिजिटल आयडेंडीटी टेक्नॉलॉजी या संस्थेच्या माध्यमातून दोघांनी दिल्ली येथे हा डिजिटल प्रकल्प सादर केला होता.  आता देशात पहिल्यांदाच गोव्यात वाळपई गोशाळेत प्रकल्प राबविला आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या