आता दाबोळी विमातळावरून थेट परदेशात औषध निर्यात

अवित बगळे
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

सर्वसाधारपणे औषधे जलमार्गे पाठवली जातात. कारण हवाई मालवाहतूक खर्च तुलनेने जास्त असतो. आता गोव्यातून हा खर्च किती असेल हे आधी पाहावे लागेल. तातडीने आणि नियंत्रित तापमानात पाठवायच्‍या औषधांसाठी हवाई मार्ग योग्य असतो. गोळ्या मोठ्या प्रमाणावर पाठवण्यासाठी आजही जलमार्गच सोयीस्कर असतो. -- डॉ. प्रवीण खुल्लर, अध्यक्ष - गोवा औषध निर्माते संघटना

पणजी: गोवा औषध निर्मिती क्षेत्रात अग्रेसर राज्य असले तरी आजवर औषध निर्यातीसाठी मुंबईलगतच्या न्हावाशेवा बंदरावरच औषध निर्मिती कंपन्यांना अवलंबून राहावे लागत असे. क्वचितप्रसंगी मुंबई विमानतळाचा वापर केला जात आहे. आता दाबोळीवरून थेटपणे परदेशात औषध निर्यात सुरू होणार आहे.

कोविड महामारीच्या काळात चांगली घडलेली अशी ही गोष्ट आहे. गोव्यातून औषध निर्यात विमानतळावरून शक्य व्हावी, यासाठी सीमाशुल्क खात्याचे कार्यालयही विमानतळावर सुरू केले जाणार आहे. भारतीय उद्योग महासंघाच्या सहा महिन्यांच्या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. आता दैनंदिन तत्वावर मालवाहू विमानाने औषधे विदेशात नेली जाणार आहेत. यासाठी दाबोळी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज मालवाहू विमानांचे उड्डाण करण्याची तयारी एमिरेट्स स्कायकार्गो या कंपनीने दर्शवली आहे.

वाहतूक खर्च वाचणार
सध्या मुंबईमार्गे औषधांची निर्यात केली जाते. जगात औषध निर्मितीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. आपल्या देशात गोवा औषध निर्मितीत अग्रेसर आहे. हरित उद्योग म्‍हणून सरकारही औषध निर्मिती उद्योगांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे जागतिक ख्यातीच्या अनेक औषध निर्मिती कंपन्यांनी आपले कारखाने गोव्यात सुरू केले आहेत. या कंपन्यांना मुंबईमार्गे औषध निर्यात करण्यासाठी मुंबईत औषधांचे कंटेनर पाठवावे लागतात. अशा एका कंटेनरवाहू वाहनासाठी कंपन्यांना प्रत्येक फेरीमागे ४० हजार रुपये खर्च येतो. यामुळे दाबोळीवरून औषध निर्यात व्हावी, यासाठी भारतीय उद्योग महासंघ प्रयत्नशील होता. 

एकावेळी ४५ टन वहनक्षमता
एका मालवाहू विमानातून ४५ टन औषधे नेली जाणार आहेत. त्यासाठी विविध प्रकारची औषधांची गरज असते. अत्यावश्यक औषधे, खोकाबंद औषधे, गोळ्या अशा प्रकारची औषधे एकत्रितपणे नेली जाणार आहे. कंपन्यांनी ४५ टन औषधे या पद्धतीने उपलब्ध केल्यावर एमिरेटस् स्कायकार्गो कंपनी दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून औषधांची थेट निर्यात करण्यासाठी मालवाहू विमानांची उड्डाणे सुरू करणार आहे. या विमानांच्या माध्यमातून कच्चा मालही थेटपणे आयात करणे औषध उत्पादक कंपन्यांना शक्य होणार आहे.

अखेर सहा महिन्‍यांच्‍या प्रयत्‍नांना यश
गेल्या सहा महिन्यात एअर कार्गो असोसिएशन, फार्मा असोसिएशन आणि एमिरेटस स्कायकार्गो यांच्यादरम्यान अनेक बैठकांचे आयोजन महासंघाच्या पुढाकाराने करण्यात आले. गोव्‍यातील औषध निर्मिती कंपन्यांकडून अमेरिका आणि युरोपमध्ये औषध निर्यात केली जाते. दाबोळी विमानतळावरून औषध निर्यात करण्यासाठी साधनसुविधांची कमतरता आहे. एमिरेटस् स्कायकार्गोच्या प्रतिनिधींनी विमानतळाची पाहणी केल्यानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरणाला काही सुविधांत बदल करण्यास सूचवले आहे. त्यानंतर ही माल वाहतूक करणे त्यांना शक्य होणार आहे. 

१२ हजार कोटींची औषधे निर्यात
राज्यात ५४ औषध निर्मिती कंपन्या आहेत. या कंपन्या वर्षाकाठी १२ हजार कोटी रुपयांची औषधे निर्यात करतात. या क्षेत्रातून २० हजार जणांना थेट रोजगार मिळालेला आहे. दररोज साठ टन औषधे निर्यातीसाठी गोव्यातून मुंबईला पाठवली जातात.

रोजगारनिर्मितीही होणार
भारतीय उद्योग महासंघाच्या म्हणण्यानुसार एकदा एमिरेटस् यांनी आपली मालवाहू विमानसेवा गोव्यातून सुरू केली की गोव्यालगतच्या परिसरातील उद्योगही या सेवेचा लाभ घेण्यासाठी पुढे येणार आहेत. यामुळे गोव्याचा विकास कार्गो हब या पद्धतीने होण्यास मदत होणार आहे. यातून राज्याला महसूल तर मिळेलच याशिवाय रोजगार निर्मितीही होणार आहे. एकदा मालवाहू विमाने सुरू झाली की एमिरेटस् प्रवासी विमाने सुरू करेल त्याचा फायदा गोमंतकीयांनाच होणार आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या