पाकिस्तानातून आलेल्या नू शी नलीनी या जहाजामुळे गोव्यावर संकट..मिलिंद नाईकांवर गुन्हा दाखल करा

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

पाकिस्तानातून नाफ्ता घेऊन आलेली नू शी नलीनी ही जहाज बेकायदेशीररित्या मुरगाव बंदरात आणून गोव्यावर संकट उभे करण्यास कारणीभूत असलेले मुरगावचे आमदार तथा मंत्री मिलिंद नाईक आणि ‘एमपीटी’चे अध्यक्ष डॉ. ई . रमेश यांच्यावर किनारी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी गोवा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी केली.

मुरगाव :  पाकिस्तानातून नाफ्ता घेऊन आलेली नू शी नलीनी ही जहाज बेकायदेशीररित्या मुरगाव बंदरात आणून गोव्यावर संकट उभे करण्यास कारणीभूत असलेले मुरगावचे आमदार तथा मंत्री मिलिंद नाईक आणि ‘एमपीटी’चे अध्यक्ष डॉ. ई . रमेश यांच्यावर किनारी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी गोवा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी केली. या एकूण प्रकरणातील मास्टरमाईंड मंत्री मिलिंद नाईक हेच असल्याने किनारी पोलिसांनी त्यांच्यावरच प्रथम गुन्हा दाखल करावा, असे निवेदनाद्वारे सांगितले. 

यावेळी आमोणकर यांच्या समवेत काँग्रेसचे गटाध्यक्ष महेश नाईक, शंकर पोळजी, सचिन भगत, सेबी फर्नांडिस, समीर खान, उमेश मांद्रेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. निर्मनुष्य आणि इंजिन नसलेले नाफ्ता वाहू जहाज कोची बंदरातून मुरगाव बंदरात दुरुस्तीचे निमित्त करून आणले होते. त्या जहाजात सुमारे तीन हजारांपेक्षा अधिक मेट्रीक टन ज्वालाग्राही नाफ्ता होता. मुरगाव बंदरात जहाज दुरुस्तीची कोणतीच साधने नसताना हे वादग्रस्त जहाज मुरगाव बंदरात आणले होते. त्याची पोलखोल सर्व प्रथम दै. ‘गोमन्तक’ने केली होती.

वृत्तपत्रातून भांडाफोड झाल्यावर हे जहाज ब्रेक वॉटर धक्क्यावरुन सुमारे पाच मैल अंतरावर खोल समुद्रात नांगरुन ठेवण्यात आले. तथापि, वादळामुळे हे जहाज भरकटत दोनापावलच्या दिशेने एका खडकावर जाऊन रुतले होते. यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला होता. हे जहाज मुरगाव बंदरात कोणी आणले, या जहाजातील नाफ्ता कुठे गेला, वापरला किती, विकला की, आणि मिळालेले पैसे कुठे गेले, भंगारात विकलेल्या जहाजांची रक्कम कुठे गेली, याचा ठावठिकाणा अद्याप लागत नाही. या एकूण वादग्रस्त प्रकरणात मंत्री मिलिंद नाईक यांचा हात असून त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद करावी, असे आमोणकर यांनी किनारी पोलिसांना सांगितले. 
किनारी पोलिसांनी जहाज मालकांवर गुन्हा दाखल करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.पण हे जहाज बेकायदेशीर रित्या मुरगाव बंदरात आणण्यास कारणीभूत असलेल्या अनेकांना पोलिसांनी रान मोकळे करून दिले आहे असा आरोप श्री. आमोणकर यांनी केला.

भंगार विकलेल्या जहाजाची रक्कम जाहीर करावी...
नू शी नलीनी जहाज बेकायदेशीररित्या मुरगाव बंदरात आणून त्या जहाजामधील नाफ्तातून करोडो रुपयांची कमाई करण्याचा उद्देश मास्टरमाईंड संशयितांचा होता. पण, निसर्गाने लुटारुंचा डाव हाणून पाडला होता. परिणामी अनेक संशयित तोंडघशी पडले. मात्र, त्यानंतर जहाज सुरक्षितपणे दोनापावला समुद्रातून काढून ते पुन्हा मुरगाव बंदरात धक्का क्रमांक आठ येथे आणून त्या जहाजामधील नाफ्ता रिकामी करण्यात आला होता. हे जहाज भंगारात विकले होते. या जहाजातील नाफ्ता कोणी खरेदी केला, त्यातून किती पैसे आले आणि भंगारात विकलेल्या जहाजाचे किती रक्कम आली, हे जाहीर करावी, अशीही मागणी आमोणकर यांनी केली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिलेले आश्‍वासन पाळावे
गेल्या वर्षी नू शी नलीनी जहाजामुळे सागरी पर्यावरण धोक्यात आले होते. हा धोका एमपीटीमुळे निर्माण झाला होता. त्यामुळे एमपीटी अध्यक्षांवर गुन्हा नोंद केला जाईल असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी त्यावेळी काँग्रेस शिष्टमंडळाला आश्‍वासन दिले होते. पण, आता ही घटना घडून वर्षं उलटले तरी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही, याची आठवण आमोणकर यांनी करून दिली. नू शी नलीनी जहाजात ज्वालाग्राही नाफ्ता नव्हे तर स्लज (मळी)होती असे जाहीर विधान मंत्री मिलिंद नाईक यांनी करून दिशाभूल केली होती. मंत्री श्री. नाईक यांनी ही दिशाभूल का केली होती, ह्याचा तपास होणे आवश्यक आहे, असे श्री. आमोणकर यांनी पत्रकारांना सांगितले.

संबंधित बातम्या