कोरोनोबाधितांची संख्या ४५३

कोरोनोबाधितांची संख्या ४५३

पणजी,

राज्‍यात आज कोरोनाचे ६० रूग्‍ण सापडले. यामुळे एकूण रूग्‍णसंख्‍या ४५३ झाली आहे. यामुळे जनतेत घबराट निर्माण झाली असून अनेक गावे स्वयंस्फूर्तीने टाळेबंदी लागू करीत आहेत. दुकाने उघडणाऱ्यांना पाच हजार रुपये दंड ठोठावू, असा लेखी इशाराही पंचायतीनी देणे सुरू केले आहे. बाहेरील व्‍यक्‍ती आपल्‍या गावात येऊ नये, यासाठी ही उपाययोजना आहे. या साऱ्यांसमोर सरकार हतबल झाल्‍याचे दिसते आहे. सरकारने टाळेबंदी मागे घेतली, तरी आता जनटाळेबंदी लादली जात आहे. सरकार अर्थव्‍यवस्‍थेला गती देण्‍यासाठी नेटाने प्रयत्‍न करीत आहे, मात्र दुसरीकडे लोक आर्थिक घडामोडी बंद पाडत आहेत. सरकार आणि जनता यांच्‍यात निर्माण झालेली अविश्‍‍वासाची दरी यातून अधोरेखित होते.
वास्‍कोच्‍या मांगोरहिल भागात दररोज कोरोनाचे रुग्ण सापडणे सुरूच आहे. आरोग्‍य सचिव नीला मोहनन यांनी आज दिलेल्‍या माहितीनुसार, मांगोरहिल भागात २६ रुग्ण तर या पॉझिटिव्‍ह रुग्णांच्या संपर्कातील २९ रुग्ण आणि ५ कोरोना पॉझिटिव्‍ह प्रवाशांची नोंद झाली. चिंबल येथे आज दोन रुग्ण सापडल्‍याने येथील रुग्णांचा आकडा १० झाला आहे. येथील लोकांची तपासणी सुरुच असून या भागाला कंटेंनमेंट परिसर म्‍हणून अद्याप तरी जाहीर करण्‍याचा विचार नसल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या. दरम्‍यान ताळगाव येथे यापूर्वी एकच रुग्ण आढळला होता, जो उपचार घेत आहे. त्‍यानंतर येथे पॉझिटिव्‍ह रुग्ण आढळलेले नाहीत. आज एक रूग्ण बराही झाला.

गोमेकॉतील गार्ड पॉझिटिव्‍ह
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील एका गार्डची चाचणी पॉझिटिव्‍ह आली आहे. यामुळे इतर गार्डची चाचणी करण्‍याची प्रक्रिया सुरू करण्‍यात आली असून त्‍याच्‍या संपर्कात आलेल्‍या सर्वांना क्‍वारंटाईन करण्‍यात आल्‍याची माहिती आरोग्‍यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे. मी गोव्‍याला सुरक्षित ठेवण्‍याची शपथ घेतली असून आपण या सर्वांनी मिळून स्वतःची काळजी घेत या संकटाला दूर पळवू, असा विश्‍‍वास मंत्री राणे यांनी दर्शविला.

व्‍हेंटिलेटरवर पहिला रुग्ण
एका हृदयविकार आलेल्‍या अत्‍यंत आजारी परिस्थितीतील रुग्णाला दोघेजण गोवा वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन आले होते. येथे त्‍याची चाचणी केली असता ती पॉझिटिव्‍ह आली आहे. हा व्‍हेंटिलेटरवर ठेवण्‍यात आलेला पहिला रुग्ण आहे. त्‍याच्‍यासोबतच्‍या दोघा जणांची पडताळणी करण्‍यासाठी त्‍यांचा शोध सरकार घेत आहे. त्‍यांचे फोन स्‍विच ऑफ असल्‍याची माहिती यावेळी देण्‍यात आली.

ते बाळ निगेटिव्‍ह
दोन दिवसांपूर्वी ईएसआय इस्‍पितळात कोरोना पॉझिटिव्‍ह म्‍हणून दाखल झालेल्‍या एका महिलेला कन्‍यारत्‍न प्राप्‍त झाले आहे. सुदैवाने हे बाळ कोरोना चाचणीत निगेटिव्‍ह असल्‍याने बाळाला गोमेकॉत आईपासून वेगळे ठेवण्‍यात आले आहे, मात्र आईवर इएसआयमध्‍येच उपचार सुरूच आहेत.

GOA GOA GOA

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com