शहरात पदेरांची संख्या वाढतेय

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

आधीच पार्कींग समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. बेशिस्तपणे पार्किंगमुळे शहरात पार्कींग व्यवस्थेचे तीनतेरा वाजत असतानाच या समस्येत पदेरांची भर पडत आहे. पदेरांमुळे विशेष करून सायंकाळी शहरात वाहतुकीची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे या पदेरांच्या व्यवसायावर नियंत्रण येण्याची गरज आहे. 

डिचोली : डिचोली शहरात दिवसेंदिवस पदेरांच्या संख्येत भर पडत असून शहरात दरदिवशी ३० हून अधिक पदेर पाव विक्री करताना दिसून येत आहेत. आधीच पार्कींग समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. बेशिस्तपणे पार्किंगमुळे शहरात पार्कींग व्यवस्थेचे तीनतेरा वाजत असतानाच या समस्येत पदेरांची भर पडत आहे. पदेरांमुळे विशेष करून सायंकाळी शहरात वाहतुकीची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे या पदेरांच्या व्यवसायावर नियंत्रण येण्याची गरज आहे. 

आधीच शहरातील बेकरी व्यवसाय परप्रांतीयांच्या हातात गेला असून सायकलवर पाटे ठेवून शहरात फिरणाऱ्या पदेरांचा पुन्हा उपद्रव सुरू झाला आहे. ‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू करण्यात आल्यानंतर शहरातील सायकलवरून फिरणाऱ्या पदेरांच्या व्यवसायावर मर्यादा आल्या होत्या. आता पुन्हा एकदा शहरात विविध ठिकाणी सकाळ-संध्याकाळ हे पदेर दिसून येत आहेत.  शहरातील न्यायालय इमारतीच्या बाजूने बाजारात जाणाऱ्या रस्त्यावरील वळणावर, लांजेकर स्टील मार्ट दुकानासमोर तसेच शहरातील मोक्‍याच्या ठिकाणी घोळक्‍याने आपल्या सायकली उभ्या करून ग्राहकांच्या प्रतीक्षेत असतात.

या पदेरांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असतो. खास करून न्यायालयाजवळ बाजारात जाणाऱ्या रस्त्यावरील वळणावर थांबणारे हे पदेर अपघातास निमंत्रण ठरू शकतात. या रस्त्यावरून वाहनांची ये-जा चालूच असते. दोन वर्षांपूर्वी रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या पदेरांविरोधात पालिकेने कारवाई हाती घेतली होती. त्यांना दंड ठोठावतानाच रहदारीस अडथळा न आणण्याची ताकीद दिली होती. तेव्हापासून काही महिने पदेरांचा उपद्रव बंद होता. मात्र, ‘ये रे माझ्या मागल्या’ या म्हणीची प्रचीती येताना पुन्हा या पदेरांचा उपद्रव वाढला असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या