मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा मुक्तिदिन षष्‍ठ्यब्दीनिमित्त बोधचिन्हाचे अनावरण

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

गोवा मुक्तिदिन षष्‍ठ्यब्दीनिमित्त १९ डिसेंबरपासून राज्यभर विविध कार्यक्रम एक वर्षभर साजरे केले जाणार आहे.

पणजी: गोवा मुक्तिदिन षष्‍ठ्यब्दीनिमित्त १९ डिसेंबरपासून राज्यभर विविध कार्यक्रम एक वर्षभर साजरे केले जाणार आहे. या कार्यक्रमांसाठी गोवा सरकारने ‘लोगो’ (बोधचिन्ह) प्रसिद्ध केला त्याचे अनावरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे गोवा मुक्तिदिन षष्ठ्यब्दीच्या सोहळ्याला उपस्थित राहणार असून त्यांचा कार्यक्रम यावेळी सावंत यांनी जाहीर केला.

१९ डिसेंबरला दुपारी दिडच्या सुमारास हे गोव्यात पोहचतील. या दिवशी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास ते पणजीतील आझाद मैदानावरील गोवा मुक्तिसंग्रामावेळी हुतात्मा झालेल्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र वाहतील. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता बांदोडकर मैदानावर आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावतील. २० डिसेंबरला ते दिवसभर असतील व वैयक्तिक कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ते पुन्हा गोव्यातून रवाना होतील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

या सोहळ्यासाठी गोव्याची कला व संस्कृती तसेच गोवा मुक्तिसंग्रामाचा इतिहास यावर माहितीपटही दाखविला जाणार आहे. राज्याच्या विविध तालुक्यातून विविध धर्म व समाजातील बारा पथके गोव्यातील कला व संस्कृती यावरील कला सादर करणार आहे. हा कार्यक्रम सुमारे पाऊणतासाचा असेल.

कोविड महामारीमुळे संख्येचे निर्बंध असल्याने हा सोहळा समस्त गोमंतकियांना पाहता यावा यासाठी त्याचे गोव्यातील सर्व स्थानिक चित्रवाहीनीवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या सोहळ्यानंतर राज्यात वर्षभर भरगच्च विविध कार्यक्रम, व्याख्याने, चर्चा घडवून आणून नव्या पिढीपर्यंत गोव्याचा इतिहास पोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

आणखी वाचा:

गोवा मुक्तिदिन सोहळा वर्षभर साजरा करणार: मुख्यमंत्री -

संबंधित बातम्या