काणकोण भाजी मार्केटवर परप्रांतियांचा कब्जा

काणकोण भाजी मार्केटवर परप्रांतियांचा कब्जा
Vegitabel Market At Cancona
काणकोण, : काणकोण पालिकेच्या भाजी मार्केट इमारतीवर परप्रांतीय विक्रेत्यांनी अनअधिकृतपणे कब्जा करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, पालिका मंडळ बघ्याची भुमिका घेऊन गप्प आहे. या मार्केट इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सर्व भिंतीवर आपली नावे लिहून जागा आरक्षित केल्या आहेत.
सुडा योजनेतून या भाजी मार्केट प्रकल्पाची उभारणी माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो याच्या कारकिर्दीत करण्यात आली होती. तत्कालीन नगरनियोजन मंत्री फ्रांसिस्को डिसोजा यांच्याहस्ते या भाजी मार्केट प्रकल्पाचे उद्‍घाटन करण्यात आले होते. त्यावेळी पालिकेकडे नोंदणी असलेल्या पण उघड्यावर बसून भाजी व फळाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना तळमजल्यावर जागा देण्यात आली होती. मात्र, पहिल्या मजल्यावरील सोपो व गाळे याचे लिलावाद्वारे वितरण करण्याचे पालिका मंडळाने ठरवले होते. मात्र, गेल्या पाच वर्षात अनेक मुख्याधिकारी व नगराध्यक्ष आले व गेले मात्र, या गाळ्याचा लिलावाची प्रक्रिया पुढे गेली नाही.

भाजी मार्केट प्रकल्पात
स्थानिकांनाच जागा द्या


भाजी मार्केट प्रकल्प संकुलात फक्त स्थानिक व्यावसायिकांनाच जागा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्याचप्रमाणे काही वेळेला स्थानिक व्यावसायिक आपल्या नावावर जागा आरक्षित करून त्या जागी परप्रांतीयांना व्यवसाय करण्यासाठी जागा भाडेपट्टीवर देतात त्या गैरप्रकारावरही पालिकेने लक्ष ठेवून तसे घडल्यास जागा परत पालिकेच्या ताब्यात घेण्याची तरतूद ठेवायला हवी, असे येथील काही व्यावसायिकांचे मत आहे.

भाजी मार्केट संकुलाचा
आठवडा बाजारासाठी वापर

भाजी मार्केट संकुलाचा वापर फक्त शनिवारच्या आठवड्याच्या बाजारादिवशी पूर्णपणे करण्यात येत होता. वापराविना पडून असल्याने व अतिक्रमणामुळे पालिका बाजार संकुलातून मिळणाऱ्या महसुलाला मुकत आहे. बाजार प्रकल्पामुळे दरमहा किमान दोन लाख रूपयाचा महसूल पालिकेच्या तिजोरीत पडण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी पालिका मंडळ प्रयत्न करताना दिसत नाही.
भाजी मार्केट प्रकल्पाच्या तळमजल्यावर पालिकेकडे नोंद असलेल्या फळ व भाजी विक्रेत्याना जागा देण्यात आली आहे. पहिल्या मजल्याचा वापर ताप्तुरती व्यवस्था म्हणून जे व्यापारी आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी रस्त्याच्या बाजूला बसून रहदारीस अडथळा ठरत होते, त्यांना देण्यात आला आहे. ही ताप्तुरती व्यवस्था आहे. काही विक्रेत्यांनी आपली नावे त्या ठिकाणी लिहिली आहेत, याचा अर्थ ती जागा त्यांची होऊ शकत नाही. पहिल्या मजल्यावरील दुकानाचा लिलाव करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना सूचना केली असल्याचे नगराध्यक्षा नितू देसाई यांनी सांगितले.
या संदर्भात नगराध्यक्षानी भाजी मार्केट प्रकल्पाची पाहाणी करून १५ भाजी-फळ विक्रेत्यापैकी फक्त सहा विक्रेत्याची पालिका दप्तरात विक्रेते म्हणून नोंद नाही त्या विक्रेत्या सबंधी चौकशी करून कारवाई करण्याची सूचना नगराध्यक्षांनी १२ मे रोजी एका नोट द्वारे मुख्याधिकाऱ्यांना केली होती

पालिकेचा २५ लाखाचा महसुल बुडाला : माजी नगराध्यक्ष
सुडायोजनेतून सुमारे ३.५० कोटी रूपये खर्चून भाजी मार्केट प्रकल्प उभा करण्यात आला. तत्कालीन नगरनियोजन मंत्री दिवंगत फ्रांसिस्को डिसोजा यांनी त्यासाठी पालिकेला भरीव सहकार्य केले. सप्टेंबर २०१५ मध्ये या प्रकल्पाचे उद्‍घाटन करण्यात आले. पहिल्या मजल्यावर आठ दुकाने आहेत. ही दुकाने भाडे पट्टीवर दिल्यास किमान महिन्यांकाठी ४० हजार रुपये व वर्षाकाठी ५ लाख रूपयाचा महसुल पालिकेला मिळणे शक्य होते.उद्‍घाटन होऊन पाच वर्षे उलटली, त्यामुळे पालिका या दुकानाच्या २५ लाख रूपये महसुलाला मुकली असल्याचे माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी सांगितले. 
No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com