तपासणी नाक्यांवरील कार्यालये एका छताखाली आणणार

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

पत्रादेवी, पोळे, अनमोड व केरी अशा मुख्य तपासणी नाक्यांवरील विविध खात्यांची पत्र्यांच्या छ्ताखाली असलेली तपासणी कार्यालये सुसज्जरीत्या इमारतीत बांधून एका छत्राखाली आणण्याची सरकारची योजना आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पेडणे येथील अबकारी कार्यालय इमारत नूतनीकरणाच्या उद्‌घाटनानंतर केले.

पेडणे:  पत्रादेवी, पोळे, अनमोड व केरी अशा मुख्य तपासणी नाक्यांवरील विविध खात्यांची पत्र्यांच्या छ्ताखाली असलेली तपासणी कार्यालये सुसज्जरीत्या इमारतीत बांधून एका छत्राखाली आणण्याची सरकारची योजना आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पेडणे येथील अबकारी कार्यालय इमारत नूतनीकरणाच्या उद्‌घाटनानंतर केले. याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री बाबू आजगावर, मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, नगराध्यक्ष सौ. श्वेता कांबळी, अबकारी खात्याचे संचालक शशांक मणी त्रिपाठी, विक्री कर खात्याचे संचालक हेमंत कुमार उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, की मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम कोरोना महामारीमुळे जरा रेंगाळले. विमानतळापासून राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. पेडणे तालुक्यात होणाऱ्या प्रत्येक प्रकल्पात प्रथम स्थानिकांना, त्यानंतर राज्यातील लोकांना रोजगार मिळेल. तुये इलेक्ट्रॉनिक सिटीसाठी भूसंपादनासाठी काही भाग शिल्लक राहीला होता. ते काम दोन महिन्यांत सुरू होईल. गोवा राज्य भाजीपाला, धान्य, दुध, चिकन, मटन अशा  प्रत्येक गोष्टीत परवालंबी आहे ते स्वालंबी व स्वंयपूर्ण व्हावे यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत आठवड्यातून दोनवेळा अधिकारी येऊन मार्गदर्शन करतील. तसेच लोकांच्या समस्या ऐकून घेतील व त्यावर उपाययोजना करण्यात येईल.

पंतप्रधान मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भर व स्वंयपूर्ण गोवा ही मोहीम राबविणार आहोत. अबकारी कार्यालय व विक्रीकर कार्यालय ही धन प्राप्ती करणारी कार्यालये आहेत. वीज, पाणी, जीएसटी यासारखी मोठी थकबाकीदार आहे आणि महत्वाचे म्हणजे हे गरीब सर्वसामान्य लोक नसून मोठे लोक आहेत. त्यांनी ही रक्कम वेळीच भरावी. हे सरकार शेतकरी, गरीब, सर्वसामान्य अशा सगळ्यांचे आहे. निवडणुका जवळ येत असल्याने काहींना मोठ मोठी स्वप्ने पडत आहेत. ते आंदोलनाची भाषा बोलत आहेत. सरकार चांगल्या प्रकारे चालत आहे. समस्या सोडविण्यासाठी आमची नेहमी तयारी असते. त्यासाठी चर्चेसाठी कोणीही यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आमदार दयानंद सोपटे यांनी पेडणे बसस्थानकातील दुकाने भाडेपट्टीवर देणे, सरकारी इस्पितळ इमारत हा विरोधकांना टीकेसाठी मुद्दा मिळत असल्याने त्यात इस्पितळ सुरू करण्यासाठी लवकर प्रयत्न व्हावेत. पत्रादेवी व पोळे येथील तपासणी नाक्यावर ज्या पत्र्याच्या शेडमध्ये विविध खात्यांची तपासणी कार्यालये आहेत ती चांगल्या प्रकारे बांधावीत. रात्री उशिरापर्यंत सुरू सणाऱ्या बारमुळे कुटुंबांना त्रास होतात. अशा बारवर कारवाई करावी आदी सूचना केल्या. 

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर म्हणाले, की पेडण्यात आम्ही मोप विमानतळ, आयुष इस्पितळ, इनडोअर स्टेडिअम बांधले. बसस्थानक सुरू केले. मोठी समस्या असलेली पर्यटन खात्यातर्फे स्मशानभूमी बांधली, शौचालय बांधतले. भगवती मंदिर व मालपे ते व्हायकाउंट हायस्कूलपर्यंत सौदर्यीकरणाचे काम हाती घेतलेले आहे. धारगळ येथे रवींद्र भवनच्या कामाला सुरवात करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील लोक पेडण्यात येतील.

प्रारंभी अबकारी खात्याचे संचालक शशांक त्रिपाठी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिल्पा गावस व नीलेश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. दिशा फोंडेकर, शोभन नाईक, दिशा नाईक आदींनी व्यासपीठावरील मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विक्रीकर खात्याचे संचालक हेमंतकुमार यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या